अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट म्हणजे काय?

भारतात ब्रॉडबँड इंटरनेटकरीता कमीतकमी ५१२ Kbps इतकी गती सुनिश्चित करण्यात आली आहे. पण आजच्या काळात ही काही पुरेशी गती नाही. जगभरातील इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतातील इंटरनेट हे संथ आणि महाग आहे. पण ते महाग आहे असे म्हटले, तरी त्यातून जे मोल्यवान ज्ञान मिळते त्यापुढे तो दर अगदी काहीही नाही. शिवाय भूतकाळावर नजर टाकली असता हा दर वरचेवर कमी होत आहे व भविष्यात तो निश्चितपणे आणखी कमी होईल.

ब्रॉडबँड इंटरनेट

एखादा साधा ‘रस्ता’ आणि ‘महामार्ग’ यामध्ये जसा फरक असतो, अगदी तसाच फरक हा ‘डायलअप कनेक्शन’ आणि ‘ब्रॉडबँड कनेक्शन’मध्ये करता येईल. महामार्गावरील वाहतुकीची गती ही नेहमीच्या रस्त्यावरील गतीपेक्षा कैक पटीने अधिक असते. त्यामुळे आपल्या वेळेची व उर्जेची बचत होऊन आपली कार्यक्षमता वाढीस लागते. तद्वत ब्रॉडबँड इंटरनेटमुळे आपल्या वेळेची व उर्जेची बचत होऊन आपली कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे विनासायास मार्गी लागतात.

ब्रॉडबँड इंटरनेट रचना

डायलअप कनेक्शनमध्ये इंटरनेटसाठी आणि फोनवर बोलण्यासाठी एकाच वायरचा वापर केला जातो. त्यामुळे सहाजिकच इंटरनेटची गती मंदावते. पण ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये इंटरनेटसाठी आणि फोनवर बोलण्यासाठी वेगवेगळ्या वायरचा वापर केला जातो. त्यामुळे इंटरनेटची गती वाढीस लागते. महामार्गावर ज्याप्रमाणे वाहतुक सुरुळीत चालावी याकरता निरनिराळ्या लेन असतात, त्याचप्रमाणे ब्रॉडबँड कनेक्शनच्या केबलमध्ये निरनिराळ्या वायर्स असतात, ज्यातून माहितीचे आदानप्रदान हे सुनियोजितपणे व सुरुळीतपणे चालते.

ब्रॉडबँड इंटरनेट केबल
ब्रॉडबँड इंटरनेटची केबल

अमर्याद इंटरनेट

महिन्याकाठी एक ठराविक रक्कम भरल्यानंतर आपण महिनाभरात कितीही इंटरनेट वापरले तरी ते संपत नाही, यालाच अमर्याद इंटरनेट (Unlimited Internet) असे म्हणतात. पण अशाने इंटरनेटच्या सुविधेचा गैरवापर होण्याची शक्यता वाढीस लागते. त्यामुळे इंटरनेट जरी बंद झाले नाही, तरी पूर्वनिश्चित मर्यादेपलिकडे इंटरनेटचा वापर झाल्यास त्याची गती मंदावते. ही पूर्वनिश्चित मर्यादा आपण घेतलेल्या ब्रॉडबँड प्लॅनवर अवलंबून असते. अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये (Unlimited Broadband Internet) पूर्वनिश्चित मर्यादा संपली, तर इंटरनेटची गती ही कमीकमी ५१२ Kbps इतकी होते. ही गतीदेखील नेहमीच्या २जी इंटरनेटपेक्षा कितीतरी अधिकआहे.

शहरामध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनसाठी अनेकानेक पर्याय आहेत. पण मला वाटतं ग्रामिण भागात मात्र BSNL हाच एकमात्र पर्याय असावा. १ ऑक्टोबर पासून BSNL आपल्या ब्रॉडबँड इंटरनेटची कमीतकमी गती ५१२ Kbps वरुन २ Mbps वर नेणार असल्याची बातमी होती. पण पुढे त्याविषयी काही कळू शकले नाही. आपल्यापैकी जर कोणी BSNLची ब्रॉडबँड सेवा वापरत असेल, तर त्याविषयी अधिक माहिती द्यावी.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.