इंटरनेट मोजणारा अनुप्रयोग

आपण जर या अनुदिनीवरील लेखांमध्ये आलेले स्मार्टफोनचे स्क्रिनशॉट्स नीट पाहिले, तर आपणास वर सुचनापट्टीत (Notification Bar) डाविकडे इंटरनेटची गती दर्शवणारे एक मोजक (Meter) दिसेल. ही गती KB/s मध्ये मोजली जाते. क्षणोक्षणी किती इंटरनेट वापरले जात आहे? किंवा सध्या इंटरनेटची गती किती आहे? ते मला सुचनाभागात इंटरनेटची गती दर्शवणार्‍या त्या अनुप्रयोगामुळे अगदी सहजतेने समजते. आपल्या स्मार्टफोनची बॅटरी किती टक्के उरली आहे? हे जसं आपल्याला सुचनाभागातील बॅटरी मोजकामुळे समजते; अगदी त्याचप्रमाणे इंटरनेटची गती समजण्याकरिता इंटरनेट मोजकाचा उपयोग होतो.

इंटरनेटची गती आणि इंटरनेटचा एकंदरीत वापर

‘इंटरनेट स्पिड मिटर लाईट’ हा अनुप्रयोग (Application) याकरिता आपल्या स्मार्टफोनवर उतरवून (Download) स्थापित (Install) करा. हा अनुप्रयोग आत्तापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर उतरवला असून सव्वा लाखांहून अधिक लोकांनी मिळून यास ५ पैकी ४.५ गुण दिलेले आहेत. या अनुप्रयोगात कोणत्याही जाहिराती नसून तो पूर्णतः मोफत आहे. आता आपण या अनुप्रयोगाची काही वैशिष्ट्ये पाहू.

इंटरनेट स्पिड मिटर लाईट अनुप्रयोग
वर डाव्या कोपर्‍यात इंटरनेटची गती दर्शवणारा मोजक दिसत आहे

‘इंटरनेट स्पिड मिटर लाईट’मुळे आपणास ‘इंटरनेटचा वापर’ आणि ‘गती’ ही ‘चालूवेळी’ (Real Time) कळत राहते. शिवाय रोजचा इंटरनेट वापरही सुचनाभागात दिसतो. अनुप्रयोगात मोबाईल आणि वाय-फाय नेटवर्कसाठी स्वतंत्र आकडेवारी दिसून येईल. मागील ३० दिवसांकरिताची आकडेवारी ही अशाप्रकारे समजू शकेल. या अनुप्रयोगाने उत्तमरित्या कार्यरत रहावे याकरिता त्यास स्मार्टफोनच्या स्मृतिकावर (Memory Card) हलवू नये.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.