‘ईमेल’ व ‘मोबाईल क्रमांक’वर पैसे पाठवणे

आजकाल ‘ऑनलाईन शॉपिंग’ आणि ‘इंटरनेट बँकिंग’चा वापर वाढू लागला आहे. अजूनही काही लोक इंटरनेट बँकिंगबाबत साशंक आहेत. पण एकंदरित समाजाचा विचार करता इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, यासंदर्भातील विश्वास हा वरचेवर दृढ होत आहे. इंटरनेटवरील व्यवहार ही काळाची गरज आहे. भविष्यात प्रत्येकाला ऑनलाईन व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरेल. ऑनलाईन बँकिंगचे अनेकानेक फायदे आहेत, जे आपण यापूर्वी आपल्या फेसबुक पेजवर पाहिले आहेत. ऑनलाईन व्यवहार शिकून घेणे हे आपल्या हिताचे व गरजेचे देखील आहे. आजच्या लेखात आपण मोबाईल क्रमांक किंवा ईमेल पत्ता वापरुन छोटा ऑनलाईन व्यवहार कसा करायचा? यासंदर्भात माहिती घेणार आहोत.

या लेखात देण्यात आलेली माहिती ही सध्यातरी केवळ ५०० रुपये इतक्या रकमेसाठी आहे, याची कृपया नोंद घ्यावी. ५०० रुपयांच्या बंधनामुळे अशाप्रकारच्या व्यवहाराची परिणामकारता कमी होते, हे अगदी खरे आहे. पण इंटरनेटच्या माध्यमातून काय शक्य आहे? व त्यामुळे आपण आपल्या अडचणी कशा सोडवू शकतो? यासंदर्भात सर्वसाधारणपणे अंदाज असावा म्हणून आजचा हा लेख लिहिलेला आहे. ५०० रुपयांच्या मर्यादेवर उपाय म्हणून इतर अनेक सेवा आहेत, ज्यांचा आपण कौशल्याने वापर करु शकतो. या सार्‍या सेवांची माहिती आपण वरचेवर घेत राहू.

बँक खाते क्रमांकाशिवाय पैसे पाठवणे

ज्यावेळी आपल्याला एका बँक खात्यावरुन दुसर्‍या बँक खात्यावर पैसे पाठवयाचे असतात, त्यावेळी आपण प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे बँक खाते हे आपल्या बँक खात्यांतर्गत जोडून घेतो व त्यानंतर त्याच्या खात्यावर पैसे पाठवतो. पण समजा फारशी ओळख नसलेल्या माणसाच्या खात्यावर पैसे पाठवण्याची आपल्यावर वेळ आली, आणि अशा त्रयस्ताचे बँक खाते आपल्या बँक खात्यांतर्गत जोडण्याची आपली ईच्छा नाहीये, तर याप्रसंगी काय करता येईल? अशावेळी आपल्याला जर त्या व्यक्तिचा ईमेल पत्ता किंवा मोबाईल क्रमांक वापरुन पैसे पाठवता आले तर? असं करणं शक्य आहे!

त्यासाठी Mobikwik हा अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर स्थापित करा. ज्या व्यक्तिला पैसे पाठवायचे आहेत, तो व्यक्तिही Mobikwik या सेवेचा वापरकर्ता असायला हवा. Mobikwikवर खाते उघडा. त्यासाठी आपणास आपला ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. आपण दिलेला ईमेल पत्ता किंवा मोबाईल क्रमांक हाच आपला Mobikwikचा खाते क्रमांक असेल.

आता समजा आपणास कोणालातरी ५०० रुपये पाठवायचे आहेत. तर आपण आपल्या स्मार्टफोनवरील Mobikwik हा अनुप्रयोग उघडाल. नेटबँकिंग, डेबिट कार्ड, किंवा क्रेडिट कार्ड वापरुन आपण आपल्या Mobikwikच्या खात्यात ५२० रुपये जमा कराल. Mobikwikच्या खात्यात ५२० रुपये जमा झाल्यानंतर ज्या व्यक्तिला ते पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तिचा Mobikwikवरील मोबाईल क्रमांक किंवा ईमेल पत्ता मागवून घ्या. Mobikwikवरील Transfer या पर्यायावर जा. Send to Wallet अंतर्गत ५२० रुपये नोंदवून Continueवर स्पर्श करा. इथे त्या व्यक्तिचा ईमेल पत्ता किंवा मोबाईल क्रमांक द्या. आवश्यकता असल्यास पैसे पाठवण्याचे कारण व सोबत एखादा संदशही पाठवता येईल. सरतेशेवटी Sendवर स्पर्श करताच क्षणात समोरच्या व्यक्तिस पैसे पोहचतील. या कामाकरिता Mobikwikच्या संकेतस्थळाचा देखील वापर करता येईल.

पैसे पाठवणे
ईमेल, मोबाईल क्रमांक वापरुन बँक खात्यावर पैसे पाठवणे

आता ५२० रुपये पाठवण्याचे कारण काय? जर समोरच्या व्यक्तिला पाठवलेली रक्कम स्वतःच्या बँक खात्यात हवी असेल, तर ५०० रुपयांपेक्षा जास्त किंवा कमी रक्कम बँक खात्यात काढून घेता येत नाही. शिवाय या कामाकरिता Mobikwikकडून २० रुपये अतिरिक्त आकारले जातात. तेंव्हा त्या व्यक्तिस ५०० रुपये आपल्या बँक खात्यात हवे असतील, तर एकंदरित ५२० रुपये इतकी रक्कम मोजावी लागते, जी त्याच्या Mobikwik Wallet मधून कमी होते. बँक खात्यात पैसे वळते करण्यासाठी त्या व्यक्तिस Transfer अंतर्गत येणार्‍या Send to Bank या पर्यायाचा वापर करावा लागेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.