उलटगणती काळक अनुप्रयोग

आजच्या या लेखाचे शिर्षक वाचायला काहीसे विचित्र वाटत असेल! आणि ही गोष्ट मी समजू शकतो. पण मराठी भाषेला जर आधुनिक काळाशी सुसंगत राखायचे असेल, तर पूर्वीपासून उपलब्ध असलेले, पण वापरात नसलेले मराठी शब्द व्यवहारात वापरणे आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करणे क्रमप्राप्त आहे. आजच्या या लेखाबाबत बोलायचे झाले, तर ‘उलटगणती’ म्हणजे ‘Countdown’, ‘अनुप्रयोग’ म्हणजे ‘Application’ म्हणजेच ज्याला आपण ‘App’ असे म्हणतो. ‘काळक’ हा शब्द मात्र नवीन असून तो मी ‘Timer’ या इंग्लिश शब्दासाठी व्यवहारात आणत आहे. सुरुवातील हे सारे शब्द ऐकण्यास विचित्र वाटतील, पण कालांतराने आपल्या सर्वांनाच या नवीन शब्दांची सवय होईल. कारण शेवटी हा सारा काही सवयीचा भाग आहे. आजच्या लेखाचे नाव इंग्लिशमध्ये सांगायचे झाल्यास त्यास ‘काऊंटडाऊन टायमर अ‍ॅप्लिकेशन’ असे म्हणता येईल. आता इंग्लिशमधील हे तीन शब्दही फार सोपे आहेत, अशातला भाग नाही! पण आपल्याला त्याची सवय झाली आहे इतकेच!

आता आजच्या मूळ लेखाला सुरुवात करु! जीवन हे काळबंधनात बांधलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते. त्यामुळे वेळेचे महत्त्व हे तर वादातीत आहे! म्हणूनच जीवनातील महत्त्वाच्या घटना या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जन्मदिवस, लग्नदिवस, लग्नसमारंभ, प्रवास, परिक्षा, नाट्यप्रयोग, पदविदान समारंभ, व्यवसायिक भेट इत्यादी एक ना अनेक महत्त्वपूर्ण घटना कुठेतरी नमूद करुन ठेवायला हव्यात! आपला स्मार्टफोन हे त्याकरिता एक उत्तम साधन आहे. आपल्याला केवळ अशा एका अनुप्रयोगाची गरज आहे, जो या महत्त्वपूर्ण घटनांची नोंद करुन ठेवेल, आणि योग्यवेळी त्या घटना आपल्या ध्यानात आणून देईल. Countdown for Events हा या कामाकरिता एक उत्तम अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगात कोणत्याही जाहिराती नसून तो पूर्णतः मोफत आहे. या अनुप्रयोगाचे विजिट (Widget) हे त्याचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

उलटगणती काळक अनुप्रयोग
Countdown for Events – उलटगणती काळक अनुप्रयोग

काऊंटडाऊन फॉर इव्हेंट्स’ हा अनुप्रयोग गूगल प्ले स्टोअरमधून आजतागायत १० हजारांहून अधिक वेळा उतरवला गेला असून ३००हून अधिक लोकांनी मिळून त्यास पाच पैकी ४.६ गुण दिलेले आहेत. या अनुप्रयोगाच्या माध्यमातून आपण अमर्याद उलटगणत्या (Unlimited Countdowns) सुनिश्चित करु शकतो. स्क्रिनवरील विजिट्सच्या सहाय्याने सुनिश्चित केलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेस किती दिवस बाकी आहेत? ते आपल्याला दिसत राहते. त्या घटनेची योग्यवेळी आठवण रहावी याकरिता त्या घटनेच्या अनुशंगाने आपण गजरही सुनिश्चित (Set Alarm) करु शकते. तास, दिवस, आठवडे, महिने, वर्ष यानुसार एखाद्या घटनेबाबत वारंवारित उलटगणती सुनिश्चित (Set Repeating Countdown) करता येते. विशेष म्हणजे हा अनुप्रयोग दिसण्यास चांगला असल्याने तो मला अधिक भावला. या अनुप्रयोगामुळे आपली कर्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल. या लेखात ‘Repeating’ या इंग्लिश शब्दासाठी ‘वारंवारित’ हा नवा शब्द वापरला असून ‘Set’ या शब्दाकरिता ‘सुनिश्चित’ या शब्द योजला आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.