टेक्स्ट टू स्पिच म्हणजे काय?

‘टेक्स्ट टू स्पिच’ (Text to Speech) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लिखित मजकूराचे आवाजामध्ये आपोआप रुपांतर केले जाते. ईपुस्तके ऐकण्याकरिता या तंत्रज्ञानाचा विशेष उपयोग होतो. आजकाल टेक्स्ट टू स्पिच या तंत्रज्ञानाने मोठी मजल मारली आहे. यामार्फत ऐकू येणारा आवाज हा जरी कृत्रिम असला, तरी तो आता जवळपास खर्‍या आवाजाप्रमाणे भासू लागला आहे. टेक्स्ट टू स्पिच या तंत्रज्ञानात आजमितिस गूगल आघाडीवर आहे. गूगलने त्याकरिता निर्माण केलेले अ‍ॅप हे गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. यात अजूनपर्यंत तरी आपल्या मराठी भाषेचा समावेश झालेला नसला, तरी इंग्लिश मजकूर ऐकण्याकरिता मात्र या अ‍ॅपचा खूप चांगला उपयोग होतो.

गूगल ‘प्ले स्टोअर’मधून ‘Google Text-to-speech’ हे ॲप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. त्यानंतर स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये या. इथे System या विभागात Accessibility नावाचा पर्याय असेल, त्यावर स्पर्श करा. यात Text-to-speech output नावाचा पर्याय शोधा आणि त्यावर स्पर्श करा. आता Google Text-to-speechची निवड करा आणि Google Text-to-speechच्या सेटिंग्जमध्ये या. इथे Language विभागात आपल्याला उपलब्ध भाषा दिसतील. त्यापैकी आपण आपणास हवी ती भाषा निवडू शकतो. अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनवर आता ‘टेक्स्ट टू स्पिच’ची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ पुस्तक वाचनापुरता मर्यादित नाही, तर कोणत्याही स्वरुपातील मजकूर वाचण्याकरिता याचा चांगला वापर होतो. विशेषकरुन अंध व्यक्तिंकरिता टेक्स्ट टू स्पिच हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. आता आपण या तंत्रज्ञानाची चाचणी घेऊ!

गूगल टेक्स्ट टू स्पिच
‘गूगल टेक्स्ट टू स्पिच’ या पर्यायाची निवड करा

चाचणीसाठी Moon+ Reader हे ॲप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून आपणास ईपुस्तके वाचता येतात. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून जे पुस्तक वाचता येते, त्यास ईपुस्तक असे म्हणतात. एव्हाना आपण Moon+ Reader हे ॲप इन्स्टॉल केले असेल, तर ते उघडण्यास हरकत नाही. ॲप उघडल्यानंतर आपणास त्यात पूर्वीपासूनच काही ईपुस्तके दिसून येतील. त्यापैकी कोणतेही एक ईपुस्तक उघडा. स्क्रिनच्या मधोमध स्पर्श केल्यानंतर आपणास स्क्रिनच्या तळाशी काही चिन्हांकित पर्याय दिसतील. त्यापैकी स्पिकरचे चिन्ह हे ‘टेक्स्ट टू स्पिच’साठी आहे. त्यावर स्पर्श केल्यास खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे TTS Options नावाची खिडकी आपल्यासमोर उघडली जाईल. START TTSवर स्पर्श करताच आपणास आपण उघडलेले पुस्तक ऐकू येऊ लागेल. पुस्तकाचे वाचन सुरु असताना पुन्हा एकदा स्क्रिनच्या मधोमध स्पर्श करा. अशाने सुरु असलेले वाचन थांबेल आणि स्क्रिनच्या तळाशी आपणास वाचनाशी संबंधीत काही पर्याय दिसून येतील. या पर्यायांचा वापर करुन आपण वाचनाची गती कमी-जास्त करु शकतो, तसेच आवाजाची पट्टी बदलू शकतो. ‘प्ले’च्या चिन्हावर स्पर्श करताच पुस्तक वाचन हे पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरु होईल.

टेक्स्ट टू स्पिच तंत्रज्ञान
‘टेक्स्ट टू स्पिच’ या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपणास ईपुस्तक ऐकता येते

गूगलचा ‘डिपमाईंड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ नावाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत एक प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत ‘वेव्हनेट’ (WaveNet) नावाची एक व्यवस्था आहे. तर ‘वेव्हनेट’ला मानवी आवाजाच्या लहरी आभ्यासून त्यानुरुप कृत्रिमरित्या अधिक चांगला आवज निर्माण करण्यात नुकतेच यश आले आहे. तेंव्हा येत्या काळात खरा आवाज आणि कृत्रिम आवाज यातील फरक ओळखता न आल्यास नवल वाटायला नको!

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.