फेसबुक आणि ट्विटर कसे जोडावे?

आपल्याकडे फेसबुक हे ट्विटरपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. पण माझ्यासहित काही लोक हे ट्विटरवर अधिक सक्रिय असतात. ट्विटरवरुन प्रकाशित केलेले ट्विट हे पुन्हा फेसबुकवरुन प्रकाशित करण्याचे कष्ट वाचावेत याकरिता मी माझे ट्विटर खाते हे फेसबुकशी जोडून घेतलेले आहे. त्यामुळे ट्विटरवरील ‘ट्विट’मध्ये लिहिलेला मजकूर हा माझ्या फेसबुक पेजवर ‘स्टेटस अपडेट’ म्हणून आपोआप प्रकाशित होतो. पण माझे आणखी एक फेसबुक पेज आहे, त्यासंदर्भात मात्र मी अगदी उलट केलेले आहे. म्हणजे त्या फेसबुक पेजवर टाकलेला ‘स्टेटस अपडेट’ हा माझ्या ट्विटर खात्यावर ‘ट्विट’च्या स्वरुपात आपोआप प्रकाशित होतो. अशाप्रकारे फेसबुक ट्विटरशी आणि ट्विटर फेसबुकशी कसे जोडायचे? ते आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

फेसबुक ट्विटरशी जोडणे

आपले फेसबुक खाते किंवा फेसबुक पेज ट्विटरशी जोडण्याकरिता facebook.com/twitter या धाग्यावर जा. त्यानंतर आपल्या मुख्य फेसबुक खात्यासमोर किंवा फेसबुक पेजसमोर दिलेल्या Link to Twitter या पर्यायावर क्लिक करा. Authorize Facebook to use your account? असा आपल्याला प्रश्न विचारला जाईल. Authorize app या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपले फेसबुक खाते हे ट्विटरशी जोडले जाईल. आता यापुढे आपण फेसबुकवर जो काही स्टेटस अपडेट टाकाल, तो ट्विटरवर ट्विटच्या स्वरुपात आपोआप प्रकाशित होईल.

फेसबुक ट्विटरशी जोडा
फेसबुक ट्विटरशी जोडण्याकरीता फेसबुकला ट्विटरवर परवानगी द्या

ट्विटरवर १६० कॅरॅक्टर्सचे बंधन आहे. तेंव्हा आपला स्टेटस अपडेट जर १६०हून अधिक कॅरॅक्टर्सचा असेल, तर तो पूर्णस्वरुपात प्रकाशित न होता अर्धवट स्वरुपात प्रकाशित होईल. पण त्या ट्विटच्या शेवटी आपल्या फेसबुकवरील स्टेटस अपडेटचा धागा जोडला जाईल. जेणेकरुन त्या धाग्यावर क्लिक करुन इतरांना आपला स्टेटस अपडेट हा पूर्णस्वरुपात वाचता येईल. कीबोर्डवरील अंक, अक्षरे, स्पेस आणि निरनिराळी चिन्हे यांना कॅरॅक्टर्स असे म्हणतात.

ट्विटर फेसबुकशी जोडणे

आपले ट्विटर खाते फेसबुक खात्याशी किंवा पेजशी जोडण्याकरीता twitter.com/settings/applications या पत्यावर जा. तिथे वरच Facebook Connect नावाचा पर्याय असेल. Connect to Facebook वर क्लिक करा आणि आवश्यक ती परवानगी देऊन आपले ट्विटर खाते फेसबुकशी जोडून घ्या. त्यामुळे आपण ट्विटरवर केलेले ट्विट हे यापुढे फेसबुकवर स्टेटस अपडेच्या स्वरुपात आपोआप प्रकाशित होईल. फेसबुकवर कॅरॅक्टर्सचे कोणतेही बंधन नसल्याने ट्विटरवरील ट्विट हे फेसबुकवर पूर्णस्वरुपात दिसेल.

ट्विटर फेसबुकशी जोडा
ट्विटर फेसबुकशी जोडल्यानंतर समोर आलेले तीन पर्याय

वर चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्यासमोर तीन पर्याय येतील. त्यातील पहिला पर्याय निवडल्यास आपले ‘पुनःट्विट’ (Retweet) देखील फेसबुकवर आपोआप प्रकाशित होतील. दुसरा पर्याय निवडल्यास आपेल ट्विट हे आपल्या फेसबुक पेजव्यतिरिक्त आपल्या फेसबुक प्रोफाईलवर देखील प्रकाशित होतील. तिसर्‍या पर्यायाच्या सहाय्याने आपण आपले कोणतेही एक फेसबुक पेज ट्विटरशी जोडू शकाल, जेणेकरुन आपण केलेले ट्विट हे त्या पेजवर आपोआप प्रकाशित होईल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.