बिल भरायला विसरु नका!

लाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, इत्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श्युरन्स, अँटिव्हायरस, यासारखी वार्षिक बिलं देखील आपल्याला भरावी लागतात. मानवी गरजा या वरचेवर वाढत चालल्या आहेत आणि त्यामुळे विविध प्रकारच्या बिलांचं प्रमाणही वाढत आहे. इतक्या सार्‍या बिलांच्या तारखा लक्षात ठेवणं हे तसं एक आव्हानात्मक काम आहे! इंन्श्युरन्ससारख्या महत्त्वाच्या गोष्टीची तारीख चुकवूनही चालत नाही! तेंव्हा या सार्‍या तारखा कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे. अर्थात स्मार्टफोन असताना आपल्याला कोणत्याही डायरीची आवश्यकता नाही. स्मार्टफोनवर चुकती करावयाची बिलं  ही त्या त्या तारखेस नमूद करुन ठेवली, की तो आपोआप आपल्याला त्यासंदर्भातील आठवण करुन देत राहिल!

बिलाची तारीख लक्षात ठेवण्याकरता ‘गूगल कॅलेंडर’

बिलं ही तारखेनुसार भरावी लागतात, आणि जेंव्हा तारखांचा संबंध येतो, तेंव्हा अर्थातच दिनदर्शिका पहावी लागते. आपल्या स्मार्टफोनवरील दिनदर्शिका ही स्मार्टफोनप्रमाणेच स्मार्ट असते. अँड्रॉईड स्मार्टफोनवर सहसा ‘कॅलेंडर’ अनुप्रयोग पूर्वीपासूनच स्थापित (Install) केलेला असतो. पण तरीही ‘गूगल कॅलेंडर’ नावाचा अद्ययावत अनुप्रयोग आपण गूगल प्ले स्टोअरमधून आपल्या स्मार्टफोनवर स्थापित करु शकाल.

आपल्या गूगल खात्याच्या सहाय्याने ‘गूगल कॅलेंडर’चा इतर उपकरणांवरील ‘गूगल कॅलेंडर’शी मेळ घातला (Sync) जातो. त्यामुळे एका उपकरणावरील गूगल कॅलेंडरमध्ये केलेला बदल हा आपल्याला ‘गूगल कॅलेंडर’च्या संकेतस्थळावर किंवा इतर उपकरणांवरील ‘गूगल कॅलेंडर’ या अनुप्रयोगावर दिसतो.

गूगल कॅलेंडर
गूगल कॅलेंडरच्या सहाय्याने बिलाची तारीख लक्षात ठेवा

गूगल कॅलेंडर हा अनुप्रयोग उघडल्यानंतर उजव्या कोपर्‍यात खाली देण्यात आलेल्या ‘अधिक’ चिन्हावर स्पर्श करा. titleच्या ठिकाणी बिलाचे नाव लिहा (उदा. इंटरनेट बिल). त्यानंतर All-day हा पर्याय ON करा. more optionsवर स्पर्श करा, Does not repeatवर स्पर्श करा. मासिक बिल असेल, तर Every month निवडा, आणि जर वार्षिक बिल असेल, तर Every yearची निवड करा. आपण ईमेल किंवा पुश नोटिफिकेशनच्या सहाय्याने या बिलाची आठवण (Reminder) मिळवू शकाल. सरतेशेवटी Saveवर स्पर्श करा. आता आपणाला बिलाची तारीख लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आपला स्मार्टफोन आपल्याला त्यासंदर्भातील आठवण करुन देत राहिल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.