बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे?

आजचे मानवी जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बॅटरीवर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनपासून ते अगदी पृथ्वीभोवती फिरणार्‍या कृत्रिम उपग्रहापर्यंत सर्वत्र उर्जेकरिता बॅटरीचा वापर केला जातो. स्मार्टफोन, लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण जवळपास रोजच चार्ज करावे लागत असले, तरी त्यातील बॅटरीबाबत मात्र आपणास फारच थोडी माहिती असते. उपकरणांतील बॅटरीचे आरोग्य टिकून रहावे याकरिता बॅटरीबाबत काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. म्हणूनच या लेखात त्यादृष्टीने काही कानमंत्र देण्यात आलेले आहेत.

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सहसा ‘लिथियम आयन बॅटरी’चा उपयोग केलेला असते. या बॅटरीमागे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले असले, तरी कालपरत्वे तिची देखील झीज होते. यावर उपाय म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी अनुसरल्यास झीज होण्याची गती कमी होऊ शकते.

  1. प्रत्येक चार्जरचे आणि बॅटरीचे काही वैशिष्ट्य असते. म्हणून उपकरण चार्ज करण्याकरिता सहसा त्यासोबत आलेले चार्जरच वापरावे. अशाने बॅटरी योग्यप्रकारे चार्ज होण्यास मदत होते.
  2. उपकरणातील बॅटरी गरम होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण फारकाळ उन्हात वा उष्ण ठिकाणी सोडू नये.
  3. बॅटरी चार्ज होत असताना ती गरम होते. त्यामुळे आपले उपकरण सदासर्वदा चार्ज करण्याकरिता लावून ठेवू नये. शिवाय स्मार्टफोन चार्ज होत असताना त्यावरील कव्हरमुळे तो गरम रहात नाहीये ना!? याची खात्री करावी.
  4. बॅटरी पूर्णपणे उतरल्यानंतर चार्जिंगला लावण्याऐवजी ती १५% वा त्याहून अधिक उरली असता चार्ज करण्यास सुरुवात करावी.
  5. आपण जर एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण दीर्घ काळाकरिता वापरणार नसाल, तर उपकरण ठेऊन देण्यापूर्वी त्यातील बॅटरी ५०% चार्ज असावी, ती पूर्णतः चार्ज वा डिस्चार्ज झालेली नसावी.
स्मार्टफोन बॅटरी चार्जिंग
बॅटरी पूर्णपणे उतरण्यापूर्वी चार्जिंगला लावावी

बॅटरीचे आयुष्य कसे वाढवता येईल? याचे काही ठोकठाळे आता आपल्या लक्षात आले असतील. त्यानुसार कळजी घेतल्यास आपल्या उपकरणांतील बॅटरीचे आयुष्य वाढण्यास नक्कीच फायदा होईल. यासोबतच स्मार्टफोनची बॅटरी कशी वाचवता येईल? तिचा कार्यकाळ कसा वाढवता येईल? त्याबाबत आपण काही माहिती घेऊ.

  1. आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ब्राईटनेस कमी ठेवावा. अशाने आपले उपकरण बॅटरीवर अधिक काळ चालेल, तसेच स्क्रिनमुळे आपल्या डोळ्यांना होणारा त्रासदेखील कमी होईल.
  2. ‘ब्लुटूथ’, ‘वाय-फाय हॉटस्पॉट’ या सुविधा कामापुरत्या वापराव्यात. तसेच रात्री झोपताना मोबाईल डेटा आणि वाय-फाय बंद ठेवल्यास बॅटरी मोठ्या प्रमाणावर वाचू शकते.
  3. अनेकदा स्मार्टफोनवर एकाहून अधिक खाती (Accounts) जोडलेली असतात. स्मार्टफोनवरील अनावश्यक खाती काढून टाकल्यास बॅटरी अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल.
  4. आपण आपला स्मार्टफोन अधुनमधून सतत हाताळात असाल, किंवा आपल्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲपवरुन सातत्याने नवे संदेश येत असतील, तर नोटिफिकेशनची लाईट बंद करुन ठेवावी. Sound and notifications सेटिंग्जमध्ये त्यासंदर्भातील पर्याय असेल.
  5. स्मार्टफोनमधील निरनिराळ्या सेन्सर्सवर अवलंबून असणारे काही अनुप्रयोग (Applications) असतात. अशा अनुप्रयोगांमुळे स्मार्टफोनची बॅटरी मोठ्या प्रमाणावर उतरु शकते. तेंव्हा बॅटरी वाचवण्यासाठी असे अनुप्रयोग टाळता येतील.

तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने आजकाल इलेक्ट्रॉनिक उपकरणे वरचेवर बदलली जातात. त्यामुळे बॅटरीची समस्या सहसा जाणवत नाही. परंतु आपण एखादे उपकरण जर दोन वर्षांहून अधिक काळ वापरणार असाल, तर मात्र वर नमूद केलेल्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.