मोफत प्रवाहवाणी अनुप्रयोग

हळूहळू इंटरनेटचे जगभरातील जाळे वाढत चालले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, चित्रफीत, असे माध्यमप्रकार हे आता आपल्या सोयीनुसार व सवडीनुसार उपलब्ध होऊ लागले आहेत. आकाशवाणी (Radio) देखील त्यास अपवाद राहिलेली नाहील. पूर्वी आकाशातून आपल्यापर्यंत पोहचणारा आकाशवाणी केंद्राचा आवाज आता इंटरनेटच्या जाळ्यातून एखाद्या प्रवाहाप्रमाणे पोहचू लागला आहे. त्यामुळे त्याच्या प्रसारण क्षेत्रास कसलीही मर्यादा राहिलेली नाही. जिथे म्हणून इंटरनेट उपलब्ध आहे, तिथे आपण ‘प्रवाहवाणी केंद्र’ (Online Radio Station) अगदी एकसारख्या सुस्पष्टतेने ऐकू शकतो. पण अशाप्रकारचे केंद्र आपल्या स्मार्टफोनवर ऐकायचे असेल, तर त्यासाठी योग्य असा अनुप्रयोगही (Application) आपल्या स्मार्टफोनवर घ्यावा लागेल. आज आपण अशाच एका मोफत आणि उत्तम अनुप्रयोगाची माहिती घेणार आहोत.

प्रवाहवाणी ऐकणे आणि प्रसारण साठवणे

आपल्या स्मार्टफोनवर ‘प्रवाहवाणी’ ऐकण्यासाठी Audials Radio हा मोफत अनुप्रयोग उतरवून (Download) स्थापित (Install) करा. हा अनुप्रयोग आत्तापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर स्थापित केला असून त्यास १० हजारांहून अधिक लोकांनी मिळून ५ पैकी ४.४ गुण दिलेले आहेत.

Audials Radio
Audials – मोफत प्रवाहवाणी अनुप्रयोग

Audialsच्या माध्यमातून जगभरातील ८० हजारांहून जास्त प्रवाहवाणी केंद्र आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध होतात. विशेष म्हणजे एखाद्या प्रवाहवाणी केंद्राचे प्रसारण हे आपण साठवूनही ठेवू शकतो. या अनुप्रयोगात अधिक चांगल्या आवाजासाठी Equalizerही आहे. आपल्याकडे जर एखाद्या आकाशवाणी किंवा प्रवाहवाणी केंद्राचा पत्ता (url) असेल, तर तो देखील या अनुप्रयोगात जोडता येतो; जेणेकरुन आपणास ते केंद्र आपल्या स्मार्टफोनवर ऐकता येईल. मला वाटतं सद्यस्थितीत गूगल प्ले स्टोअरवर प्रवाहवाणी ऐकण्याकरिता Audials हा एक सर्वोत्तम मोफत पर्याय आहे.

नोंद – प्रवाहवाणी (Online Radio) ऐकण्याकरिता चित्रप्रवाहाइतके (Online Video) इंटरनेट लागत नाही, पण तरीही आपल्या स्मार्टफोनवरील नेहमीच्या डेटा पॅकवर प्रवाहवाणीचा मनमुराद आनंद घेता येणार नाही. तेंव्हा त्यासाठी आपल्याकडे अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट असणे आवश्यक आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.