रेझिस्टिव्ह टचस्क्रिन

आजकाल एटीएम मशिनपासून ते आपल्या हातातील स्मार्टफोनपर्यंत सर्वत्र टचस्क्रिन तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो. दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा? हे जाणून घेणं तर आवश्यक आहेच; पण मूळात हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं? हे देखील थोडंफार लक्षात घ्यायला हरकत नाही! कारण ज्ञान कधी कुठे उपयोगाला येईल? ते सांगता येत नाही. शिवाय एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जितकी अधिक माहिती असते, तितका आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो. तेंव्हा टचस्क्रिन तंत्रज्ञानाबद्दल आता आपण अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

टचस्क्रिनमध्ये रेझिस्टिव्ह (Resistive) आणि कॅपॅसिटिव्ह (Capacitive) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण रेझिस्टिव्ह टचस्क्रिनबद्दल जाणून घेऊ, आणि पुढील लेखात कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनबाबत पाहू.

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन तंत्रज्ञान

रेझिस्टिव्ह प्रकारच्या टचस्क्रिनमध्ये दोन थर (Layer) असतात आणि त्या दोन थरांच्या दरम्यान किंचतसे अंतर असते. यातील वरच्या बाजूचा थर हा प्लास्टिक पदार्थापासून बनलेला असतो, तर आतील थर हा काचेचा (Glass) असतो. जेंव्हा आपण प्लास्टिक पदार्थापासून बनलेल्या थराला स्पर्ष करतो, तेंव्हा तो किंचतसा दाबला जातो, आणि त्यामुळे काचेच्या आतील थरास त्याचा स्पर्श होतो. या दोन थरांचा स्पर्ष झाल्याने विद्युतप्रवाहात जो बदल होतो, तो मोजला जातो आणि त्यावरुन स्क्रिनवरील स्पर्श झालेले ठिकाण हे निश्चित केले जाते.

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन रचना
रेझिस्टिव्ह टचस्क्रिनची रचना
(स्रोत – By Mercury13 [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commons)

रेझिस्टिव्ह टचस्क्रिनचे फायदे

  • रेझिस्टिव्ह टचस्क्रिन कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनपेक्षा स्वस्त आहे.
  • अशाप्रकारची स्क्रिन वापरण्याकरिता स्क्रिनवर हलकासा दाब निर्माण करेल अशी कोणतीही गोष्ट चालते.

रेझिस्टिव्ह टचस्क्रिनच्या मर्यादा

  • रेझिस्टिव्ह स्क्रिनवर स्पर्श केला असता, कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनइतका उत्तम प्रतिसाद मिळत नाही.
  • स्क्रिन तितकीशी सुस्पष्ट दिसत नाही.
  • स्क्रिनवर एकाचवेळी एकाहून अधिक ठिकाणी स्पर्श केला असता (multi-touch), स्पर्शबिंदू व्यवस्थित ओळखले जात नाहीत.

आजकाल स्मार्टफोन तंत्रज्ञानात बहुतकरुन कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनचाच वापर होतो. पण एटीएम मशिन सारख्या ठिकाणी मात्र सहसा रेझिस्टिव्ह टचस्क्रिनचा उपयोग केला जातो.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.