वेब ब्राऊजरचा मेळ घालणे

आजकाल आपण स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप अशी एकाहून अधिक स्मार्ट उपकरणे वापरतो. या उपकरणांची व पर्यायाने आपली कार्यक्षमता जर वाढवायची असेल, तर या उपकरणांचा परस्पर संवाद आवश्यक आहे व त्यासाठी ते करत असलेल्या कामांचा ‘मेळ घालणे’ गरजेचे आहे. ‘मेळ घालणे’ म्हणजेच ‘Sync करणे’. कदाचित आपण Sync (सिंक) हा शब्द आपल्या स्मार्टफोनवर कधीतरी पाहिला असेल. एखादी गोष्ट Sync केल्यास ती इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या सर्व उपकरणांवर उपलब्ध होते. म्हणजेच आपण कोणत्याही एका उपकरणावर केलेला बदल हा इतर सर्व उपकरणांवर दिसून येतो. पण ही सर्व प्रक्रिया नेमकी कशी चालते? ते आज आपण वेब ब्राऊजरच्या संदर्भात पाहणार आहोत.

गूगल क्रोम वेब ब्राऊजरचा मेळ घालणे

आपल्यापैकी अनेकजण प्रामुख्याने ‘गूगल क्रोम’चा वापर करतात. तेंव्हा आपण ‘गूगल क्रोम’ या वेब ब्राऊजरचा मेळ कसा घालायचा? ते पाहू!

  1. संगणकावर गूगल क्रोम वेब ब्राऊजर उघडा.
  2. मेनूवर क्लिक करा. Chrome menu  अशा ‘तीन आडव्या रेषा’ किंवा ‘तीन उभे बिंदू’ हे ‘मेनू’चे सार्वत्रिक चिन्ह आहे, हे कायम लक्षात ठेवा.
  3. त्यानंतर Settings मध्ये जा.
  4. तिथे Sign in हा पहिलाच पर्याय आहे. गूगल खाते (जीमेल) वापरुन ‘प्रवेश नोंद’ (Sign in) करा.
  5. आता आपल्या स्मार्टफोनवर गूगल क्रोम उघडा.
  6. मेनू उघडून (तीन उभे बिंदू) Settings वर जा. इथे आपण कदाचित पूर्वीपासूनच ‘लॉग इन’ असाल. नसाल तर ‘लॉग इन’ करा. ‘लॉग इन’ व ‘साईन इन’ या दोहोंचा अर्थ एकच होतो.
  7. नोंद – आपण संगणकावरील गूगल क्रोममध्ये ज्या गूगल खात्याच्या माध्यमातून प्रवेश केला आहे, तेच गूगल खाते वापरुन स्मार्टफोनवरील गूगल क्रोममध्ये प्रवेश करावा.
  8. अशाप्रकारे संगणक व स्मार्टफोनवरील गूगल क्रोम वेब ब्राऊजर हे गूगल खात्याच्या सहाय्याने जोडले जातील (मेळ घातला जाईल) व त्यांचा ऐकमेकांशी संवाद सुरु होईल.

आपण संगणकावरील ‘क्रोम’मध्ये जर एखादे संकेतस्थळ बुकमार्क केले, तर ते स्मार्टफोनवरील ‘क्रोम’च्या बुकमार्क विभागात दिसेल. आपण स्मार्टफोनवर क्रोमच्या सहाय्याने केलेल्या वेब ब्राऊजिंगचा इतिहास आपल्याला संगणकावरील क्रोम वेब ब्राऊजरमध्ये दिसेल. यालाच ‘मेळ घालणे’ किंवा ‘सिंक (Sync) करणे’ असे म्हणतात.

फायरफॉक्स - मेळ घालणे
संगणकावरील फायरफॉक्स वेब ब्राऊजरचा स्मार्टफोनवरील फायरफॉक्स वेब ब्राऊजरशी मेळ घातला जात आहे

जी गोष्ट क्रोम वेब ब्राऊजरला लागू पडते. तिच गोष्ट इतर सर्व प्रमुख वेब ब्राऊजरला लागू पडते. आपल्या जर फायरफॉक्स वेब ब्राऊजचा मेळ घालायचा असेल, तर संगणक व स्मार्टफोनवरील फायरफॉक्स वेब ब्राऊजरमध्ये फायरफॉक्सचे समान खाते वापरुन प्रवेश करावा (Sign in / Log in). अर्थात त्याकरिता प्रथम फायरफॉक्सकडे एक नवे खाते तयार करावे लागेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.