हॅशटॅग म्हणजे काय?

हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, गूगल प्लस, टम्बलर अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील दिसू लागला आहे. मी स्वतः जेंव्हा या सोशल नेटवर्कस्‌च्या माध्यमातून ‘मराठी इंटरनेट’वरील एखादा लेख वाटतो (शेअर करतो), तेंव्हा आवर्जून अशा हॅशटॅग्जचा वापर करतो. हॅशटॅग म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग तरी काय? हे प्रथम आपण जाणून घ्यायला हवं. त्यानंतरच आपल्याला त्याचे महत्त्व समजेल व आपण त्याचा कौशल्याने वापर करु शकाल. त्यामुळे आज आपण ‘हॅशटॅग’बाबत अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

#हॅशटॅग म्हणजे?

‘मराठी इंटरनेट’च्या फेसबुक पेजवर जेंव्हा मी एखादी माहिती पोस्ट करतो, तेंव्हा त्या माहितीच्या शेवटी आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले दिसतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे म्हणतात. मी जी माहिती देत आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? हे लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात.

उदाहरणार्थ : मी ‘कोणता ‘संगणक’ चांगला आहे?’ याबाबत माहिती सांगत असेन, तर मी त्या माहितीच्या शेवटी #संगणक असा हॅशटॅग वापरेन. मी ‘अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी चांगला म्युझिक प्लेअर कोणता?’ याबाबत काही लिहिले असेल, तर #स्मार्टफोन #म्युझिकप्लेअर असे हॅशटॅग वापरेन.

हॅशचे चिन्ह - हॅशटॅग
‘हॅश’चे हे चिन्ह वापरुन #हॅशटॅग तयार करतात

हॅशटॅगचा उपयोग काय?

हॅशटॅगमुळे एक ‘धागा’ (Link) निर्माण होतो. हा धागा आपल्याला हॅशटॅगमध्ये नमूद केलेल्या विषयाशी संबंधित इतरांनी केलेल्या पोस्ट एकत्रितपणे एका वेगळ्या पानावर दाखवतो. अशाने माहितीची वेगवेगळ्या विषयानुसार वर्गवारी होते.

उदाहरणार्थ : जर मी फेसबुकवर #संगणक हा हॅशटॅग वापरला, तर त्यामुळे जो धागा निर्माण होईल, तो आपल्याला फेसबुकवरील इतर लोकांनी #संगणक हा हॅशटॅग वापरुन केलेल्या पोस्टस्‌कडे घेऊन जाईल. अशा वर्गवारीमुळे आपल्याला ‘संगणक’ या विषयाची फेसबुकवरील माहिती एकत्रितपणे वाचता येईल.

हॅशटॅग वापरल्यामुळे आपण लिहित असलेली माहिती ही अधिक लोकांपर्यंत पोहचण्याची शक्यता वाढते. याव्यतिरीक्त आपल्या मनातील भावना अत्यंत थोडक्यात व्यक्त करण्याकरीतादेखील हॅशटॅगचा वापर होऊ शकतो.

हॅशटॅगचा वापर कसा करावा?

हॅशटॅगचा वापर करत असताना दोन शब्द वापरायचे झाल्यास ते दोन शब्द एकत्र जोडून लिहावे. ते एकत्र न जोडल्यास केवळ पहिल्या शब्दाचाच एक हॅशटॅग तयार होईल.

उदाहरणार्थ : ‘मराठी इंटरनेट’चा हॅशटॅग तयार करायचा झाल्यास तो #मराठीइंटरनेट असा करावा लागेल. अन्यथा केवळ #मराठी असा हॅशटॅग तयार होईल व इंटरनेट हा शब्द त्यातून वेगळा राहिल. अशाने #मराठीइंटरनेट हा स्वतंत्र धागा तयार होणार नाही. म्हणूनच, हॅशटॅग लिहित असताना शब्दांच्यामध्ये जागा सोडू नये, ‘स्पेस’ देऊ नये.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.