१३५०० रुपयांना लॅपटॉप

निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळी उपकरणे ही अधिक उपयुक्त ठरतात. जसं प्रवासात स्मार्टफोन महत्त्वाचा आहे, घरी असताना वेब ब्राऊजिंग करण्यासाठी टॅब अधिक सोयीचा वाटतो, आणि आत्ता मी लिहित आहे, तसं काही लिहायचं असेल, तर लॅपटॉप गरजेचा ठरतो. त्यामुळे सध्यातरी एक प्रकारचे उपकरण हे दुसर्‍या उपकरणाची जागा भरुन काढताना दिसत नाही. म्हणूनच आपल्याकडे स्मार्टफोन किंवा टॅब जरी असला, तरी इतर महत्त्वाची कामे करण्यासाठी लॅपटॉप हा लागतोच! पण लॅपटॉप हा स्मार्टफोन, टॅब प्रमाणे सहसा कमी किंमतीत मिळत नाही. लॅपटॉप म्हटलं की, मोठा खर्च आला! पण तरी त्यातल्यात्यात स्वस्त लॅपटॉप घ्यायचा म्हटला, तर कोणता लॅपटॉप घेता येईल? त्या दृष्टीने ‘एसस’ (Asus) कंपनीचा EeeBook 205TA हा साधारण १३,५०० रुपयांचा नोटबुक प्रकारातील लॅपटॉप मला योग्य वाटतो.

एसस EeeBook 205TA नोटबुक लॅपटॉप

११.४९ इंचाचा नोटबुक प्रकारातील हा लॅपटॉप वजनाला अत्यंत हलका असून याचे वजन हे केवळ ९८० ग्रॅम इतके आहे. तुलनात्मकदृष्ट्या पहायचे झाल्यास नेहमीचा लॅपटॉप हा साधारण १५.५ इंचाचा असतो, तर त्याचे वजन हे साधारण २५०० ग्रॅम इतके असते. एससच्या या नोटबुकची किंमत लॅपटॉपच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, तेंव्हा त्याची वैशिष्ट्येही तशी मर्यादित असणार हे ओघाने आलेच! पण आपल्या गरजा फारशा नसतील, तर आपल्याला या मर्यादा जाणवणार नाहीत.

एसस नोटबुक लॅपटॉप
एसस EeeBook 205TA नोटबुक लॅपटॉप असा दिसतो

हा लॅपटॉप आकाराने लहाव व वजनाने हलका आहे, तेंव्हा रोजच्या प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी तो अगदी योग्य आहे. या लॅपटॉपची मेमरी ही केवळ ३२ जीबी आहे व त्यापैकी साधारण १० जीबी इतकीच मेमरी ही आपल्यासाठी उपलब्ध असल्याचे समजते. तेंव्हा अर्थातच या लॅपटॉपवर फार काही डाऊनलोड करुन ठेवता येणार नाही. पण यास मेमरी कार्ड चालू शकते, तेंव्हा आपण काही प्रमाणात या लॅपटॉपची मेमरी वाढवू शकतो.

हा लॅपटॉप विंडोज ८.१ या OS वर चालतो. एससच्या या नोटबुकची रॅम २ जीबी इतकी असून, त्यात इंटेलचा क्वाड कोअर प्रोससर आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा लॅपटॉप साधारण १२ तासांपर्यंत चालू शकतो. या लॅपटॉपची बाकी लहान-सहान वैशिष्ट्ये मी आता या इथे काही सांगत नाही, कारण आपल्याला ती ऑनलाईन शॉपिंग साईटवर पहाता येतील. या इथे मी एव्हढंच सांगेन की, गेम खेळण्यासाठी किंवा इतर अवजड कामांसाठी हा लॅपटॉप योग्य नाही. लिहिणे, कोडिंग करणे, वेब ब्राऊजिंग करणे, अशाप्रकारच्या कामांसाठी मात्र हा लॅपटॉप उत्तम आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.