अनुप्रयोग कसा विकत घ्यावा?

आभ्यास, कला, मनोरंजन, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांत स्मार्टफोनने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. स्मार्टफोनवरील अनुप्रयोगांमुळे (Applications) दैनंदिन जीवनाची कार्यक्षमता वाढीस लागली आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये अनेकानेक उपयुक्त अनुप्रयोग हे अगदी मोफत मिळतात. त्यामुळे सहसा आपल्याला ते विकत घेण्याची गरज पडत नाही. पण बर्‍याचदा असे अनुप्रयोग  हे जाहिराताधारित असतात. ‘अनुप्रयोग का विकत घ्यावा?’ या लेखात आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की, एखादा जाहिरातयुक्त अनुप्रयोग मोफत वापरण्याऐवजी तो रास्त दरात विकत घ्यावा. अशाने आपल्याला अनुप्रयोगांतर्गत जाहिरातींपासून कायमची मुक्तता तर मिळतेच! शिवाय अनुप्रयोगामार्फत देण्यात येणारे अतिरिक्त पर्यायही उपलब्ध होतात.

‘अनुप्रयोग विकत कसा घ्यावा?’ ते आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. अनुप्रयोग विकत घेण्याचे अनेक पर्याय आहे. आपण आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग किंवा अगदी कॅश ऑन डिलिव्हरीच्या (COD) सहाय्याने देखील अँड्रॉईड अनुप्रयोग विकत घेऊन शकतो.

गूगल वॉलेट – क्रेडिट कार्डने अनुप्रयोग विकत घेणे

सर्वप्रथम wallet.google.com या संकेतस्थळावर जा. इथे Payment Mathods अंतर्गत येणार्‍या Add A Payment Method या पर्यायावर क्लिक करा. तिथे दिलेल्या जागी आपल्या क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती भरुन आपल्याजवळील क्रेडिट कार्ड ‘गूगल वॉलेट’शी (Google Wallet) जोडा. त्यानंतर गूगल प्ले स्टोअरमधील एखादा विकत्रीचा अनुप्रयोग इन्टॉल करा. खरेदीची रक्कम ही आपल्या क्रेडिट कार्डमधून वळती केली जाईल.

गूगल प्ले गिफ्ट कार्ड – ऑनलाईन खरेदी

गूगल प्ले गिफ्ट कार्ड्स
गूगल प्ले गिफ्ट कार्ड असे दिसते

‘गूगल प्ले गिफ्ट कार्ड’ हा गूगल प्ले स्टोअरवरील अनुप्रयोग विकत घेण्याचा आणखी एक चांगला उपाय आहे. विशेष म्हणजे याकरिता क्रेडिट कार्ड हाच एकमेव उपाय नसून डेबिट कार्ड, नेटबँकिंग किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडूनही अशाप्रकारे अ‍ॅप्स खरेदी करता येतात. स्नॅपडिल या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन आपल्याला गूगल प्ले गिफ्ट कार्ड्स विकत घेता येतील. हे गिफ्ट कार्ड्स ७५० रु., १००० रु. आणि १५०० रु. अशा तीन दरांत उपलब्ध आहेत. विकत घेतलेले गिफ्ट कार्ड घरी आल्यानंतर आपल्याला त्यावर एक ‘संकेत’ (Code) मिळेल. गूगल प्ले स्टोअरच्या पर्यायांमध्ये Redeem नावाचा पर्याय आहे. तिथे त्या गिफ्ट कार्डवर नमूद केलेला ‘संकेत’ (Code) टाकावा. त्यामुळे आपल्या प्ले स्टोअरच्या खात्यावर गिफ्ट कार्डचे पैसे जमा होतील व त्यातून आपण प्ले स्टोअरवरील अनुप्रयोग विकत घेऊ शकाल.

एकदा विकत घेतलेला अनुप्रयोग हा कायमचा आपला होऊन जातो. शिवाय तो एकाचवेळी एकाहून अधिक उपकरणांवर चालतो. शब्दकोशासारखे अनेक उपयुक्त अनुप्रयोग हे ५० रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान विकत मिळतात. दैनंदिन वापरातील एखाद्या चांगल्या अनुप्रयोगाची उपयुक्तता लक्षात घेता हा दर तसा रास्त आहे. एखाद्या चित्रपट तिकटाच्या किंमतीत जर एखादा गरजेचा अनुप्रयोग विकत घेता येत असेल, तर हा आपल्या फायद्याचाच व्यवहार आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.