इंटरनेट आणि डेटा सेंटर

आपण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपली स्थिती अद्यान्वित करतो, छायाचित्र अपलोड करतो; पण ही सर्व माहिती नक्की कुठे साठवली जात असेल? असा कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का? अन्नधान्य हे जसे एखाद्या गोडाऊनमध्ये साठवले जाते, अगदी त्याचप्रमाणे आपण इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड केलेला सर्व डेटा हा डेटा सेंटरमध्ये साठवला जातो. त्यानंतर मागणीप्रमाणे हा डेटा इतरांना पुरवण्यात येतो. स्मार्टफोनमधील डेटा ज्याप्रमाणे मेमरी कार्डवर साठवला जातो, संगणकावरील डेटा हा ज्याप्रमाणे हार्ड डिस्क ड्राईव्हवर साठवण्यात येतो, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून दिसणारा डेटा हा शक्यतो डेटा सेंटरमध्ये साठवलेला असतो.

आता प्रत्यक्ष या लेखाच्या उदाहरणाने ही माहिती समजावून घेऊ. सध्या मी हा लेख लिहित आहे. हा लेख लिहून झाल्यानंतर मी तो प्रकाशित करेन. प्रकाशित केलेला हा लेख अमेरिकेतील एखाद्या डेटा सेंटरमध्ये साठवला जाईल. त्यानंतर मी फेसबुकवर येऊन या लेखाबद्दल आपल्याला माहिती देईन. ती माहिती देखील फेसबुकच्या डेटा सेंटरमध्ये साठवली जाईल. या लेखाबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपण हा लेख वाचण्याकरीता या लेखाच्या धाग्यावर क्लिक कराल. तेंव्हा आपण या लेखाची मागणी केली आहे हे लक्षात घेऊन डेटा सेंटरमधून हा लेख आपल्याला पाठवण्यात येईल. अशाप्रकारे डेटा सेंटरच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण होते.

वरील चित्रफितीत गूगलचे डेटा सेंटर दाखवलेले आहे. डेटा सेंटर हे जणू इंटरनेटचा मेंदू आहे. त्यात साठवलेले ज्ञान हे गरजेप्रमाणे वापरले जाते. आपल्या मेंदूप्रमाणेच डेटा सेंटरला देखील कार्यरत राहण्याकरीता प्रचंड उर्जा लागते. त्यामुळे डेटा सेंटर थंड रहावे याकरीता सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. इथे जगभरातील महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने त्याच्या सुरक्षेचासुद्धा चोख बंदोबस्त करण्यात येतो. डेटा सेंटरमुळे पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये याची देखील विशेष काळजी घेण्यात येते. त्यामुळे अनेक कंपन्या त्याकरीता लागणारी वीज ही पवनउर्जा, सौरउर्जा अशा अपारंपारिक माध्यमातून मिळवतात.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.