एअरप्लेन मोड म्हणजे काय?

विमानप्रवासात आपल्या फोनचा सेल्युलर, वाय-फाय, ब्ल्युटूथ, GPS असा वायरलेस संपर्क पूर्णतः बंद करण्यासाठी Airplane Modeचा (एअरप्लेन मोड) वापर केला जातो. एअरप्लेन मोड सुरु केला असेल, तर विमानप्रवासात मोबाईल बंद करण्याची आवश्यकता भासत नाही. पण ‘एअरप्लेन मोड’ हा विमानापुरताच मर्यादित आहे का? की त्याचा त्यापलिकडे दैनंदिन जीवनात काही उपयोग आहे? मला स्वतःला तर या पर्यायाचा फार चांगला उपयोग झालेला आहे.

पूर्वी माझ्या मोबाईलवरील इंटरनेट जर बंद झाले, तर मी माझा मोबाईल बंद करुन चालू करायचो, त्यामुळे त्यावरील इंटरनेट हे पुन्हा पूर्ववत सुरु व्हायचे. काही काळानंतर माझ्या लक्षात आले की, मोबाईल पूर्णतः बंद करुन चालू करण्याऐवजी जर एअरप्लेन मोड सुरु करुन बंद केला, तरी देखील मोबाईलवरील इंटरनेट पूर्ववत सुरु होते. थोडक्यात काय? तर सेल्युलर नेटवर्क (मोबाईल नेटवर्क) रिर्फेश करण्याकरिता एअरप्लेन मोडचा चांगला उपयोग होतो.

स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये आपल्याला कधीतरी Airplane Mode (एअरप्लेन मोड) हा पर्याय दिसला असेल. तेंव्हा हा पर्याय जर सुरु करायचा असेल, तर आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये या. इथे Wireless & Networks या विभागात More वर स्पर्श करा. समोर Airplane mode दिसेल, त्यावर स्पर्श करताच तो सुरु होईल. तो एकदा सुरु केल्यानंतर आपल्या फोनचा वायरलेस संपर्क पूर्णतः बंद होईल. त्यामुळे आपल्याला जर आपल्या स्मार्टफोनची बॅटरी वाचवायची असेल, तर एअरप्लेन मोड सुरु करण्यास हरकत नाही.

एअरप्लेन मोड
‘एअरप्लेन मोड’ सुरु केला आहे. ‘एअरप्लेन मोड’चे (विमानाचे) चिन्ह नोटिफिकेशनमध्ये दिसत आहे.

एअरप्लेन मोड सुरु केल्यानंतर आपल्याला स्मार्टफोनच्या नोटिफिकेशनमध्ये विमानाचे एक चिन्ह दिसेल. स्मार्टफोनवरील ‘एअरप्लेन मोड सुरु आहे’, असा त्या चिन्हाचा अर्थ आहे. तो बंद केल्यानंतर ते चिन्ह निघून जाईल. आपल्या स्मार्टफोनवरील ‘एअरप्लेन मोड’ सुरु आहे की नाही? ते आपल्याला त्या चिन्हावरुन कळेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.