एमएक्स प्लेअरमध्ये सबटायटल्स

अँड्रॉईड स्मार्टफोनवर चित्रफीत (Video) पाहण्याकरिता ‘एमएक्स प्लेअर’ (MX Player) हा एक उत्तम अनुप्रयोग (App) आहे. मला वाटतं आपल्यापैकी बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनवर एमएक्स प्लेअरचाच वापर करत असतील. एमएक्स फ्लेअरमध्ये एखादी चित्रफीत पहात असताना त्या चित्रफितीचे सबटायटल्स कसे मिळवायचे? त्यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.

कधी कधी एखादी चित्रफीत पहात असताना स्क्रिनच्या तळाशी चित्रफितीतील संवाद लिहिलेले दिसतात, त्यास ‘सबटायटल्स’ (Subtitles) असे म्हणतात. सबटायटल्समुळे आपल्याला चित्रफितीतील संवाद व्यवस्थित समजण्यास मदत होते. अनेकदा एखाद्या दुसर्‍या भाषेतील चित्रफीत ही आपल्याला आपल्या भाषेतील सबटायटल्समुळे चांगल्याप्रकारे कळते. दूरचित्रवाहिणीवरील अनेक इंग्लिश चॅनल्स अशाप्रकारे सबटायटल्स दाखवतात.

एमएक्स प्लेअर
एमएक्स प्लेअरवर सबटायटल्स

एमएक्स प्लेअर अंतर्गत सबटायटल्स मिळवण्याची कृती

एमएक्स प्लेअरमध्ये चित्रफीत पहात असताना त्या चित्रफितीकरिता उपलब्ध सबटायटल्स अगदी सहजतेने मिळविण्यासाठी खालील कृती करता येईल.

  1. चित्रफित चालू करा.
  2. त्या चित्रफितीचे पर्याय उघडा. (स्क्रिनच्या वर उजव्या कोपर्‍यात जे तीन उभे बिंदू दिसत आहेत, ते पर्यायाचे चिन्ह आहे.)
  3. Subtitle वर स्पर्श करा.
  4. Get subtitles online वर स्पर्श करा.
  5. Search वर स्पर्श करा.
  6. Get subtitles online नावाची खिडकी उघडली जाईल.
  7. Search for च्या English असे लिहिलेले दिसेल. त्यावर स्पर्श करताच भाषांची यादी उघडली जाईल. त्यातून ‘मराठी’ ही भाषा देखील निवडता येईल. पण ‘मराठी’ भाषा निवडणे सध्यातरी केवळ एक औपचारिकता आहे. कारण मराठी भाषेतून सबटायटल्स शोधायचे झाल्यास आपल्याला काहीएक सापडेल असे वाटत नाही. लोकसंख्येच्या बाबतीत जगात १५व्या क्रमांकावर असलेली मराठी याबाबत शेवटच्या काही क्रमांकात असेल.
  8. आपल्या चित्रफितीचे नाव योग्य असल्यास थेट OK वर स्पर्श करण्यास हरकत नाही; किंवा Enter your search text वर स्पर्श करुन योग्य त्या सबटायटल्सचा शोध घ्यावा.
  9. आपल्या चित्रफितीसाठी जर सबटायटल्स उपलब्ध असतील, तर त्यासंदर्भातील एक यादी आपल्यासमोर येईल. त्यापैकी एखाद्या सबटायटल्सवर स्पर्श करताच ते क्षणात आपल्या स्मार्टफोनवर उतरवले जाईल (Download होईल) आणि आपल्याला स्क्रिनच्या तळाशी दिसू लागेल.

अशाप्रकारे एमएक्स प्लेअरच्या अंतर्गतच आपल्याला एखाद्या चित्रफीतीसाठी अगदी सहजतेने सबटायटल्स मिळू शकतील.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.