गूगल टास्क्स्‌ – मोफत अनुप्रयोग

मला वाटतं एखादी गोष्ट सुनियोजित आणि आभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याबाबतीत आपण सध्यातरी फार मागे आहोत. कार्याची रुपरेषा ठरवून कामांची यादी करणे, चालू घडामोडी व अनुभव लिहून ठेवणे, भविष्याचा आढावा घेणे अशा गोष्टींना विशेष महत्त्व द्यायला हवे. पूर्वी व्यवसायिक लोक या कारणास्तव सोबत डायरी बाळगत असत. पण आता त्याची काही आवश्यकता उरली नसून इंटरनेटवरील संकेतस्थळे (Internet Website) आणि स्मार्टफोनवरील अनुप्रयोग (Smartphone Applications) या माध्यमातून आपण आपले नियोजन अधिक कार्यक्षमतेने व परिणामकारक पद्धतीने करु शकतो. या दिशेने एक छोटीशी सुरुवात म्हणून आपण काही दिवसांपूर्वी गूगल टास्क्स्‌ (Google Tasks) या गूगलच्या सेवेबद्दल जाणून घेतलं होतं. आता गूगलची ही सेवा स्मार्टफोनवर कशी वापरायची? ते आज आपण पाहणार आहोत.

गूगलने ‘गूगल टास्क्स्‌’करिता अधिकृतरित्या कोणताही अनुप्रयोग (App) तयार केलेला नाही. पण इतर अनुप्रयोग विकासकांनी (Application Developers) मात्र यासाठी चांगले अनुप्रयोग तयार केलेले आहेत. आज आपण त्यापैकी एका मोफत व चांगल्या अनुप्रयोगासंदर्भात माहिती घेणार आहोत. तो आपण आपल्या स्मार्टफोनवर स्थापित (install) केल्यास आपल्याला To-Do List (टू डू लिस्ट) प्रकारातील इतर कोणताही अनुप्रयोग विकत घेण्याची तशी आवश्यकता वाटणार नाही. सध्या मी माझ्या स्मार्टफोनवर दैनंदिन नियोजनाकरिता याच अनुप्रयोगाचा वापर करत आहे.

स्मार्टफोनवर गूगल टास्क्स्‌

गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Tasks: Astrid To-Do List Clone नावाचा अनुप्रयोग स्थापित करा (Install the App). हे अ‍ॅप आजतागायत १ लाखांहून अधिक लोकांनी उतरवले (Download केले) असून अडीच हजारांहून अधिक लोकांनी मिळून यास ५ पैकी ४.४ गुण दिलेले आहेत.

या अनुप्रयोगात मेळ घालण्याची सुविधा (Sync) उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, स्मार्टफोनवरील गूगल टास्क्स्‌मध्ये केलेला बदल हा आपल्याला गूगल टास्क्स्‌च्या संकेतस्थळावर आणि जीमेलमध्ये दिसून येईल. याउलट संकेतस्थळ किंवा जीमेलच्या माध्यमातून केलेला बदल हा स्मार्टफोनवरील या अनुप्रयोगात दिसेल.

मी गूगल टास्क्स्‌ संदर्भात पूर्वीच एक लेख लिहिलेला आहे. तेंव्हा स्मार्टफोनवरील गूगल टास्क्स्‌ संदर्भात त्याहून फारसं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तरीही या अनुप्रयोगाची महत्त्वाची वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेणं या इथे आगत्याचे ठरेल. त्यासाठी स्मार्टफोनवर स्थापित केलेला Tasks – Astrid To-Do List Clone हा अनुप्रयोग उघडा.

स्मार्टफोनवर गूगल टास्क्स्‌
स्मार्टफोनवर आपल्या कामांची यादी अशी दिसेल.

या अनुप्रयोगाच्या तळाशी उजवीकडे आपल्याला एक अधिकचे चिन्ह दिसेल, त्यावर स्पर्श करा. इथे कामाचे नाव, वर्णन, प्रकार, वेळ इत्यादी गोष्टी आपणास नमूद करता येतील. याशिवाय या अनुप्रयोगाच्या वरील बासूस उजवीकडे जे मायक्रोफोनचे चिन्ह दिसत आहे, त्याचा वापर केल्यास आपल्याला एखादे काम हे टाईप न करता केवळ बोलून यादीत जोडता येईल. या अनुप्रयोगाच्या Settingsमध्ये Synchronizationचा पर्याय आहे.  Tasks – Astrid To-Do List Cloneचा गूगल टास्क्स्‌च्या सेवेशी मेळ घालण्यासाठी या पर्यायाचा वापर करावा. Backup हा पर्याय वापरुन या अनुप्रयोगावरील कामे ही आपल्या स्मार्टफोनच्या मेमरीमध्ये घेता येतील; किंवा मेमरीवरील कामे ही या अनुप्रयोगावर घेता येतील. Miscellaneous अंतर्गत Voice reminders नावाचा एक पर्याय आहे. त्याचा वापर केल्यास आपल्याला कामांची नावे (Tasks Name) दिलेल्या वेळी ऐकू येतील. इतकेच नव्हे तर Calendar assistant हा पर्याय सुरु केल्यास हे अ‍ॅप गूगल कॅलेंडरमधील कार्यक्रमांची देखील आठवण करुन देईल.

अशाप्रकारे आपल्या कामांची यादी संभाळणारा हा अनुप्रयोग पूर्णतः मोफत तर आहेच! शिवाय तो वापरण्यास देखील सोपा आहे. या अनुप्रयोगाच्या विजिटमुळे आपल्या कामांची यादी ही आपल्याला थेट आपल्या स्मार्टफोनच्या एका स्क्रिनवर दिसू शकते. सोबतच अशाने नवीन कामे देखील सहजतेने जोडता येतील. तेंव्हा भविष्यकालिन कामे न विसरता लक्षात ठेवायची असल्यास, हा साधा-सोपा, मोफत पण उपयुक्त अनुप्रयोग वापरण्यास हरकत नाही.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.