गूगल बुकमार्कस्‌

‘गूगल बुकमार्कस्‌’ (Google Bookmarks) ही गूगलची अशी एक सेवा आहे जी फारशी कोणाला माहितही नसेल. आजच्या लेखात आपण त्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी ‘बुकमार्क’बाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास ‘बुकमार्क म्हणजे काय?’ हा लेख वाचावा. त्या लेखात ‘बुकमार्क’ ही संकल्पना इंटरनेटच्या अनुशंगाने समजावून सांगितली आहे. शिवाय एखादे संकेतस्थळ हे वेब ब्राऊजरमध्ये कसे बुकमार्क करावे? याबाबतही त्यातून थोडीफार कल्पना येईल.

इंटरनेटवरील प्रत्येक पानाचा एक पत्ता असतो. हा पत्ता आपल्याला वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये दिसतो. इंटरनेटवर अशी अगणित पाने आहेत. त्यापैकी आपल्याला उपयोगी वाटणार्‍या किंवा आवडलेल्या सर्व पानांचे पत्ते लक्षात ठेवणे म्हणजे एक अशक्यकोटीतील काम आहे. त्यामुळे एखादे गरजेचे पान हे पुढीलवेळी सहजतेने सापडावे याकरिता त्या पानाचा पत्ता लगचेच कुठेतरी साठवून ठेवणे आवश्यक ठरते. अशावेळी बुकमार्कस्‌ची सेवा पुरवणार्‍या व्यवस्थेचा उत्कृष्ट उपयोग होतो.

वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारशेजारी दिसणारे तार्‍याचे चिन्ह हा बुकमार्क साठवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. पण त्याला काही मर्यादा आहेत. आपण जर वेब ब्राऊजरमध्ये लॉग-इन केलेले नसेल, तर साठवलेले बुकमार्कस्‌ हे आपल्याला एकाच उपकरणावरुन हाताळता येतात; आणि आपण जर वेब ब्राऊजरमध्ये लॉग-इन केलेले असेल, तर आपल्याला आपले बुकमार्कस्‌ हे निरनिराळ्या उपकरणांवरुन वापरता येतात, पण त्याकरिता आपल्या सर्व उपकरणांवर त्या विशिष्ट वेब ब्राऊजरचाच वापर करावा लागतो. इथे ‘उपकरण’ म्हणजे संगणक, स्मार्टफोन, टॅब, इत्यादी.

गूगल बुकमार्कस्‌च्या सहाय्याने मात्र ही अडचण सुटू शकते. कारण गूगल बुकमार्कस्‌ हे एक स्वतंत्र संकेतस्थळ असून ते कोणत्याही वेब ब्राऊजरला बांधिल नाही. गूगलच्या या सेवेचा वापर केल्यास आपल्याला आपले बुकमार्कस्‌ हे वेगवेगळ्या उपकरणांवरुन व निरनिराळ्या वेब ब्राऊजर्सच्या माध्यमातून हाताळता येतील.

गूगल बुकमार्कस्‌
‘मराठी इंटरनेट अनुदिनी’ या संकेतस्थळाचा पत्ता गूगल बुकमार्कस्‌मध्ये साठवताना

गूगल बुकमार्कस्‌च्या सहाय्याने आपण इंटरनेटवरील आपल्या आवडीचे धागे (Links) साठवून ठेवू शकतो. जेणेकरुन पुढीलवेळी इंटरनेटवरील आवडीची व गरजेची पाने ही आपल्याला अगदी सहज सापडतील.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.