पॉवर बँक म्हणजे काय?

बँकेमध्ये आपण जसे पैसे साठवतो, त्याप्रमाणे पॉवर बँकेत वीजेच्या रुपात उर्जा साठवली जाते. स्मार्टफोन, टॅब अशा उपकरणांची बॅटरी ही अधिक काळ टिकत नाही. घराबाहेर पडल्यानंतर किंवा प्रवासात असताना आपल्या स्मार्टफोनची बॅटरी जर उतरली, तर अशावेळी आपला स्मार्टफोन चार्ज करण्याकरिता पॉवर बँकेचा उपयोग होतो. पॉवर बँक ही स्मार्टफोनमधील बॅटरीहून फारशी निराळी नाही. कारण सहसा आपल्या स्मार्टफोनमधील बॅटरीचा बॅकअप म्हणूनच हीचा वापर केला जातो. बाजारात अनेक कंपन्यांच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत.

प्रत्येक स्मार्टफोनमधील बॅटरीची ज्याप्रमाणे एक क्षमता असते, अगदी त्याचप्रमाणे पॉवर बँकेची देखील कमी-अधिक अशी एक क्षमता असते. अशाप्रकारच्या उपकरणाची वीज साठवून ठेवण्याची क्षमता जितकी अधिक असेल, तितका तिचा दर हा वाढत जातो. अर्थात इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे पॉवर बँकेचे दर हे कंपनीवरही अवलंबून असतात.

mAh हे बॅटरीच्या क्षमतेचे एकक आहे. एखाद्या बॅटरीच्या संदर्भात जितके mAh अधिक असतील, तितकी त्या बॅटरीची ताकद अधिक असते. त्यामुळे पॉवर बँक घेत असताना या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ही साधरण २००० ते २५०० mAh इतकी असते. तेंव्हा एखाद्या पॉवर बँकची क्षमता जर १३००० mAh असेल, तर तिच्या सहाय्याने आपला मोबाईल हा एकाहून अधिक वेळा चार्ज केला जाऊ शकतो.

पॉवर बँक खरेदी करत असताना त्यात १A आऊटपुटची सोय आहे का? ते देखील तपासून पहावे. हे मी यासाठी सांगत आहे, कारण आजकाल सर्वसाधारपणे वापरात असलेल्या एखाद्या स्मार्टफोनला १A इतक्या दराने वीज पुरवली जाते. आपल्या स्मार्टफोनच्या वीजकावर (Charger) हा आकडा लिहिलेला असतो. जर वीजकावर २A असे लिहिले असेल, तर पॉवर बँकेतील २A इतक्या आऊटपुटचा वापर करावा. खाली नमूद केलेल्या पॉवर बँकतील २A इतक्या आऊटपुटचा वापर मात्र १A च्या गतीने वीज पुरवण्यासाठी होऊ शकतो.

TP Link पॉवर बँक
TP Link १०४००mAh पॉवर बँक

आपल्याकडेही एखादी पॉवर बँक असावी असे आपल्याला वाटत असेल, तर मी TP Link 10400 mAh बाबत सुचवेन. या पॉवर बँकेची क्षमता १०४०० mAh आहे. यात १A चे एक आणि २A चे एक असे दोन आऊटपुट आहेत. म्हणजेच हीच्या सहाय्याने आपल्याला एकाचवेळी २ उपकरणे चार्ज करता येतात. यात प्रकाशासाठी एक छोटासा दिवा देखील आहे. आपल्या स्मार्टफोनचा नेहमीचा वीजक (Charger) या पॉवर बँकला USB पोर्टच्या सहाय्याने जोडता येतो.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.