‘प्रवाहित’ (स्ट्रिमिंग) म्हणजे काय?

‘स्ट्रिम’ (Stream) म्हणजे ‘प्रवाह’. तेंव्हा ‘मिडाया स्ट्रिम’ला (Media Stream) ‘माध्यमप्रवाह’ असे म्हणता येईल. इथे माध्यम (Media) हा शब्द ध्वनिफीत, चित्रफीत, छायाचित्र इत्यादी प्रकारच्या फाईल्सच्या अनुशंगाने आला आहे. युट्यूबवरील चित्रफीत हे माध्यमप्रवाहाचे एक उत्तम उदाहरण आहे. कारण यात चित्रफीत ही इंटरनेटच्या जाळ्यातून जणूकाही एखाद्या प्रवाहाप्रमाणे आपल्या उपकराणापर्यंत पोहचत असते.

‘स्ट्रिमिंग’ला (Streaming) ‘प्रवाहित’ असे म्हणण्यास हरकत नसावी. त्यायोगे ‘Media Streaming’ला ‘प्रवाहित माध्यम’ असे म्हणावे लागेल. ‘Video Stream’ला ‘चित्रफीत प्रवाह’, ‘Audio Stream’ला ‘ध्वनिफीत प्रवाह’; ‘Video Streaming’ला ‘प्रवाहित चित्रफीत’, तर ‘Audio Streaming’ला ‘प्रवाहित ध्वनिफीत’ असे म्हणता येईल. शिवाय ‘Online Video’ला ‘चित्रप्रवाह’, ‘Online Audio’ला ‘ध्वनिप्रवाह’ आणि ‘Internet Radio’ला ‘प्रवाहवाणी’ असे पर्यायी शब्द देता येतील. या अनुशंगाने लक्षात आले की, मध्यंतरी ट्विटरवर मी ‘Charger’ला ‘वीजक’ असा प्रतिशब्द सुचवला होता, आणि ‘Sync’साठी आपण ‘मेळ’ हा शब्द तर वापरतच आहोत. ‘मराठी इंटरनेट’च्या माध्यमातून अनेक नवे मराठी शब्द, प्रतिशब्द, संकल्पनाशब्द तयार होतील आणि प्रचलित होतील असे दिसते. त्यामुळे हे मराठी शब्द लक्षात ठेवा, कारण काही काळानंतर मी केवळ या मराठी शब्दांचा, संकल्पनांचा वापर करेन.

‘प्रवाहवाणी’ (Internet Radio) हे देखील ‘प्रवाहित माध्यमाचे’ (Media Streaming) एक अतिशय छान उदाहरण आहे. यात विशिष्ट स्वरुपातील (Format) ध्वनिफीत इंटरनेटच्या जाळयातून आपल्या विद्युत उपकरणापर्यंत (Electronic Device) प्रवाहित होत असते. एखादी ध्वनिफीत ही ‘उतरवून’ (Download) ऐकणे वेगळे आणि ती ‘प्रवाहित’ (Streaming) करुन ऐकणे वेगळे. एखादी ध्वनिफीत एकदा उतरवल्यानंतर इंटरनेटशिवाय ऐकता येते. पण तिच ध्वनिफीत प्रवाहित करुन ऐकण्याकरीता आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असते.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.