बुकमार्क म्हणजे काय? – वेब पेज साठवणे

आज आपण ‘बुकमार्क’ म्हणजे काय?’ ते व्यवस्थित समजून घेऊ. पुस्तक वाचत असताना आपण सहसा संबंध पुस्तक हे काही एकाच बैठकीत वाचून काढत नाही. तेंव्हा आपले पुस्तक कुठपर्यंत वाचून झाले आहे? याकरीता पानांच्या दरम्यान ठेवलेल्या खूणगाठेस ‘बुकमार्क’ असे म्हणतात. आधुनिक काळात हीच संकल्पना पुस्तकांपुरती सिमित न रहाता ती इंटरनेटवरील पानांच्या बाबतीतही रुढ झाली. इंटरनेटवरील आवडलेल्या पानाचा ‘अ‍ॅड्रेस बार’मधील पत्ता वेब ब्राऊजरमध्ये अथवा एखाद्या संकेतस्थळावर साठवून ठेवणे यास ‘बुकमार्क करणे’ असे म्हणतात. इंटरनेटवरील पान बुकमार्क केल्याने भविष्यात ते शोधून काढणे सोपे जाते.

बुकमार्कचे चिन्ह – तारा

वेब ब्राऊजर अथवा संकेतस्थळावर ‘तारा’ या चिन्हाने ‘बुकमार्क’ करण्याची सुविधा दर्शविण्यात येते. आपल्या वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बार शेजारी आपल्याला तार्‍याचे एक चिन्ह दिसेल. ते ‘बुकमार्क’चे चिन्ह आहे. त्यावर क्लिक केल्यास तत्क्षणी आपण इंटरनेटवर वाचत असलेले पान हे वेब ब्राऊजरमध्ये साठवले जाते. अशाने भविष्यात आपल्याला ते पान सहजतेने सापडते. इंटरनेटवरील महत्त्वाची व उपयुक्त पाने साठवण्याकरीता बुकमार्कचा चांगला उपयोग होतो.

बुकमार्क - मराठी इंटरनेट
वरील चित्रात ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’चे मुख्य पान वेब ब्राऊजरमध्ये ‘बुकमार्क’ केलेले दिसत आहे

आपल्याला जर ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’ आवडत असेल, तर marathiinternet.in या पत्त्यावर जा. त्यानंतर वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारशेजारी दिसणार्‍या तार्‍याच्या चिन्हावर क्लिक करा. यामुळे ‘मराठी इंटरनेट’च्या मुख्य पानाचा पत्ता हा वेब ब्राऊजरमध्ये ‘बुकमार्क’ होईल (साठवला जाईल). असं केल्याने पुढील वेळी ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’वर येणे सोपे जाईल. कारण तेंव्हा आपल्याला केवळ त्या बुकमार्कवर म्हणजेच ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या वेब ब्राऊजरमध्ये साठवलेल्या धाग्यावर क्लिक करावे लागेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.