युट्यूबवर काळानुरुप शोध घेणे

ब्रॉडबँड इंटरनेटची गती वाढल्यापासून माझं टिव्ही पाहणं हे जवळपास पूर्णतः बंद झालेलं आहे. कारण सहसा सर्व प्रमुख चित्रवाहिन्यांचे (Tv Channels) युट्यूबवर चॅनल्स आहेत. टिव्हीवरील कार्यक्रम हे काही वेळताच युट्यूबवर येतात. तेंव्हा हे कार्यक्रम आपल्या आवडीनुसार, सवडीनुसार पाहता येत असताना ते खास टिव्हीसमोर बसून पाहण्यात काही अर्थ उरलेला नाही. जी गोष्ट कार्यक्रमांना लागू पडते, अगदी तीच गोष्ट बातम्यांनाही लागू पडते. पण नेमका आजचा कार्यक्रम किंवा अलिकडील बातमी युट्यूबवर सहजतेने कशी शोधायची? कारण युट्यूवरील चित्रफितींच्या गर्दीत अनेकदा ताज्या चित्रफिती (Video) शोधणे अवघड होऊन जाते.

युट्यूब अ‍ॅपवरील Subscriptions विभाग

एखादे चॅनलचे ‘वर्गणीदार होणे’ (Subscribe करणे) हा त्या चॅनलच्या ताज्या चित्रफिती मिळवण्याचा एक अत्यंत सोपा उपाय आहे. आपण जर स्मार्टफोनवर युट्यूबचे अ‍ॅप वापरत असाल, तर आपले अ‍ॅप अद्यान्वित (Update) करा. या अ‍ॅपमध्ये Home, Subscriptions आणि Account असे तीन विभाग आहेत. त्यातील मधला Subscriptionsचा विभाग आपण वर्गणीदार झालेल्या (Subscribe केलेल्या) सर्व चॅनल्सच्या ताज्या चित्रफिती दाखवतो. त्यामुळे नवीन चित्रफिती पहाणे सोपे जाते.

स्मार्टफोनवर नवीन चित्रफितीची सुचना

स्मार्टफोनवरील युट्यूब अ‍ॅप वापरुन एखाद्या चॅनलच्या मुख्य पानावर गेल्यानंतर आपल्याला Subscribeच्या शेजारी एक घंटीचे चिन्ह दिसेल. त्यावर स्पर्श केल्यास त्या चॅनलमार्फत चढवल्या जाणार्‍या (Upload) प्रत्येक नवीन चित्रफितीची सुचना (Notification) आपल्याला आपल्या स्मार्टफोनवर मिळेल. अशाने आपल्याला आपल्या आवडत्या मालिकेतील नवीन कार्यक्रम हे अगदी न चुकता पाहता येतील.

युट्यूब शोध चाळणी (Search Filter)

युट्यूबवर एखादा शोध घेतल्यानंतर समोर काही शोध परिणाम येतात. या शोध परिणामांची परिणामकारकता वाढवण्यासाठी युट्यूबने आपल्याला Filterचा (चाळणी) पर्याय दिलेला आहे. याचा वापर करुन आपण शोधांती आलेले परिणाम चाळून त्यातून आपल्याला हव्या असलेल्या चित्रफिती मिळवू शकता.

युट्यूबवर काळानुरुप शोध घेणे
युट्यूबवर Filter या पर्यायाचा वापर करुन काळानुरुप शोध घेता येतो.

उदाहरणार्थ, समजा आपण संगणकावरील वेब ब्राऊजरमध्ये युट्यूब हे संकेतस्थळ उघडले आणि Maharashtra असा शोध घेतला. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे Filter या पर्यायाचा वापर करुन आपण Maharashtra या विषयासंदर्भातील अलीकडील चित्रफिती पाहू शकाल. आपण जर स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर एखादा शोध घेतल्यानंतर शोध चौकटीच्या (Search Box) उजव्या बाजूला आपल्याला एका खाली एक तीन रेषा दिसतील. तो Filterचा पर्याय आहे. या पर्यायाचा वापर करुन स्मार्टफोनवर देखील चित्रफितींची काळानुरुप चाळणी करता येते.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.