लॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे
मागील महिन्यात मी लॅपटॉपकरिता एक स्पिकर विकत घेतला. या स्पिकरचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला स्वतःला तो मनापासून आवडला! पण खास लॅपटॉपसाठी तयार करण्यात आलेल्या या स्पिकर संदर्भात मला एक अडचण जाणवली. या स्पिकरला लॅपटॉपच्या USB पोर्टच्या सहाय्याने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे लॅपटॉप सुरु असेपर्यंतच हा स्पिकर वापरता येतो. एकदा लॅपटॉप बंद केल्यानंतर या स्पिकरचा वापर करता येत नाही. खास लॅपटॉपसाठी तयार करण्यात आलेला हा स्पिकर या कारणाने स्मार्टफोनसाठी वापरता येत नाही. पण काही दिवसांपूर्वी मला या अडचणीवर एक सोपा उपाय सापडला, तो मी या लेखात देत आहे.
स्पिकरला USB पोर्टने वीजपुरवठा करायचा झाल्यास लॅपटॉपखेरीज आणखी कोणत्या गोष्टीचा वापर करता येईल? यावर विचार केला असता, मला पॉवर बँक वापरण्याची कल्पना सुचली. त्यादृष्टीने मी एक पॉवर बँक वापरुन पाहिली. पण वीज पुरवठ्याच्या दरात तफावत असल्याने ही योजना अयशस्वी ठरली. मी Lenovo 2.0 – M0520 हा स्पिकर वापरतो. हा एक स्वस्त आणि चांगला स्पिकर आहे. या स्पिकरला ०.५ ॲम्पिअर दराने वीजपुरवठा करावा लागतो. पण पॉवर बँक या सहसा १ किंवा २ ॲम्पिअर दराने वीजपुरवठा करतात.

त्यानंतर काही दिवसांनी मी TP Linkची पॉवर बँक विकत घेतली. यासंदर्भात मी फेसबुकवरुन माहिती दिली होती. ही एक अगदी उत्कृष्ट पॉवर बँक आहे. तर TP Linkची पॉवर बँक मी लिनोवोच्या स्पिकरला जोडून पाहिली. त्यासाठी मी त्यावरील १ ॲम्पिअरच्या USB पोर्टचा वापर केला. तेंव्हा हा स्पिकर विनासायास काम करु लागला. या पॉवर बँकच्या माध्यमातून स्पिकरसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज पुरवठा होतो. त्यामुळे आता लॅपटॉप बंद केल्यानंतर मी हे स्पिकर माझ्या स्मार्टफोनला अगदी सहज जोडू शकतो. स्पिकरसाठी फारशी वीज लागत नाही. तेंव्हा एकदा पॉवर बँक चार्ज केल्यानंतर त्यावर हा स्पिकर अनेक तास चालू शकतो. त्यामुळे लॅपटॉपचा स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरण्यासाठी ही एक चांगली क्लुप्ती आहे.