स्मार्टफोनमधील सेंसर्स

कान, नाक, जिभ, त्वचा, डोळे या मानवी शरिरातील ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आवाज, गंध, चव, स्पर्श, दृष्य या स्वरुपात सभोवतालच्या परिसराची माहिती मिळते. मानवी शरिरातील ज्ञानेंद्रियांप्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील ‘सेंसर्स’ (Sensors) असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर्स हे वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात व त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची उपयुक्तता वाढीस लागते. पण प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सर्व प्रकारचे सेंसर्स असतीलच असे नाही. चांगल्या व आधुनिक स्मार्टफोनमध्ये सेंसर्सची संख्या अधिक असते. अशाप्रकारे प्रत्येक स्मार्टफोनवर एकूण सेंसर्सची संख्या ही निरनिराळी असते. पण आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये नेमके किती? आणि कोणते सेंसर्स आहेत? ते कसे ओळखणार?

स्मार्टफोनमधील सेंसर्स दर्शवणारा अनुप्रयोग

आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते सेंसर्स आहेत? ते आपणास एका अनुप्रयोगाच्या (Application) सहाय्याने अगदी सहजतेने समजू शकते. त्या अनुप्रयोगाचे नावच Sensors असे असून गूगल प्ले स्टोअरमधून आपणास तो मोफत उतरवता (Donwload) येईल. Sensors आपल्या स्मार्टफोनवर उतरवून स्थापित (Install) करा आणि उघडा.

सेंसर्स अनुप्रयोग
सेंसर्स अनुप्रयोगाच्या सहाय्याने एखाद्या स्मार्टफोनमधील उपलब्ध सेंसर्स दिसतात

कोणत्याही जाहिराती नसलेला हा अनुप्रयोग अतिशय सुटसुटीत, मेमरीने हलका आणि वापरण्यास सोपा आहे. या अनुप्रयोगाच्या पर्यायांमध्ये आपल्याला आपल्या स्मार्टफोनवरील सेंसर्सची यादी दिसेल. त्यात Accelerator, Light, Proximity अशी काही सेंसर्सची नावे सापडतील. या अनुप्रयोगाच्या माध्यमातून आपण निवडलेल्या सेंसरने तत्क्षणी दर्शवलेली आकडेवारी साठवून ठेवता येते (History). पण या वैशिष्ट्याची कोणास काही फारशी गरज पडेल, असे वाटत नाही.

 सेंसर्सचा उपयोग काय?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी आपल्याला दोन सोपी उदाहरणे देतो. Auto Brightness या वैशिष्ट्यामुळे प्रकाशाच्या तिव्रतेनुसार आपल्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस आपोआप कमी-जास्त होतो. म्हणजेच दुपारच्या उन्हात आपल्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस हा आपोआप वाढतो, तर रात्रिच्या अंधारात तो आपोआप कमी होतो. पण मुळात आपल्या स्मार्टफोनला दुपार आणि रात्र यातील फरक कसा समजतो? तर तो त्यामध्ये उपलब्ध असलेल्या Light सेंसरमुळे!

आता समजा आपल्याला एखादा कॉल आला! आपण तो कॉल उचलून जेंव्हा स्मार्टफोन कानाला लावतो, तेंव्हा आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन पूर्णतः विझते. आता आपल्या स्मार्टफोनला कसे समजते की, आपण आपला फोन कानाला लावला आहे? तर ते त्यास Proximity सेंसरमुळे समजते. एखादा कॉल आल्यानंतर आपण तो उचलला आणि आपला हात स्क्रिनच्या जवळ नेला, तरी देखील Proximity सेंसरमुळे आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन विझेल. कारण एखादी गोष्ट स्क्रिनच्या किती जवळ आहे? हे त्या सेंसरमुळे आपल्या स्मार्टफोनला समजते.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.