स्मार्टफोनवर उपयुक्त साधने

मानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत होते. म्हणूनच स्मार्टफोनचा स्मार्टनेस हा बर्‍याचअंशी सेन्सर्समध्ये दडला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

आपला स्मार्टफोन हा आता भिंग, दिशादर्शक, पट्टी, इत्यादी जुन्या काळातील निरनिराळ्या साधनांची जागा घेऊ लागला आहे. म्हणूनच आजकाल याप्रकारची साधने विकत घेण्याची तशी आवश्यकता राहिलेली नाही. ‘गूगल प्ले स्टोअर’मधील अनुप्रयोग (Application) हे स्मार्टफोनमधील सेन्सर्सच्या साहाय्याने अशाप्रकारच्या साधनांची जागा भरून काढत आहेत.

स्मार्टफोनवर निरनिराळी साधने एकत्र

झोतदिवा (Flashlight), एकक परिवर्तक (Unit Converter), काळक (Timer), दिशादर्शक (Compass), सपाटीदर्शक (Bubble Level), गणित्र (Calculator), काळमापक (Stop Watch), भिंग (Magnifying Glass), आरसा (Mirror), पट्टी (Ruler), इत्यादी सारी साधने (Tools) आपल्याला स्मार्टफोनवरील एकाच अनुप्रयोगात मिळाली तर? आजच्या काळात हे शक्य आहे! त्यासाठी आपल्याला Army Knife for Android हा मोफत अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर उतरवून (Download) स्थापित (Install) करावा लागेल.

स्मार्टफोनवर उपयुक्त साधने
स्मार्टफोनवरील अनुप्रयोग सेंसर्सचा वापर करुन अशाप्रकारे निरनिराळी साधने उपल्ब्ध करुन देऊ शकतात

अर्थात वरील सर्वच्या सर्व साधने ही आपल्या स्मार्टफोनसाठी असतीलच असे नाही! कारण आपल्या स्मार्टफोनवर कोणकोणते सेंसर्स उपलब्ध आहेत? त्यावर वरील साधनांची उपलब्धता अवलंबून आहे! उदाहरणार्थ, आपल्या स्मार्टफोनमध्ये जर Geomagnetic Field हा सेंसर नसेल, तर दिशादर्शक (Compass) काम करणार नाही. त्यामुळे उत्तर दिशा कोणती? हे समजणार नाही. तेंव्हा वर नमूद केलेली सर्व साधने स्मार्टफोनवर चालण्याकरिता त्यावर आवश्यक ते सेंसर्स असणे गरजेचे आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.