CCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर म्हणून स्मार्टफोन

दुकानात किंवा ATM केंद्रामध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसवलेला असतो, त्यास CCTV कॅमेरा असे म्हणतात. याशिवाय ‘बेबी मॉनिटर’ प्रकारात मोडणारा एक कॅमेरा असतो, जो घरातील लहान बाळांवर लक्ष ठेवण्याकरिता उपयोगात येतो. CCTV किंवा ‘बेबी मॉनिटर’ ऑनलाईन विकत घेणे शक्य आहे; पण आपल्याकडे जर एखादा वापरात नसलेला स्मार्टफोन असेल, तर ही उपकरणे वेगळ्याने विकत घेण्याची तशी आवश्यकता नाही. कारण आपल्याकडील स्मार्टफोनचा वापर CCTV कॅमेरा किंवा बेबी मॉनिटरप्रमाणे होऊ शकतो. अर्थात खास लक्ष ठेवण्याकरिता बनवण्यात आलेल्या उपकरणाची जागा आपला स्मार्टफोन कदाचित पूर्णतः भरुन काढू शकणार नाही, पण एक कामचलाऊ उपकरण म्हणून तो निश्चितच वेळ मारुन नेऊ शकतो.

स्मार्टफोन – CCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर – संकल्पना

आज मी या कामाकरिता वापरता येईल अशा कोणत्याही एका विशिष्ट्य अनुप्रयोगाबद्दल विस्तृत माहिती देणार नाही. पण स्मार्टफोनचा वापर हा CCTV कॅमेरा किंवा बेबी मॉनिटर म्हणून कसा करायचा? या प्रश्नामागील संकल्पना विषद करणार आहे. या कामाकरिता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतील!? ते आपण सर्वप्रथम पाहू!

आवश्यक बाबी

  1. एक कॅमेरा असणारा स्मार्टफोन
  2. सुयोग्य अनुप्रयोग
  3. एक लॅपटॉप
  4. एक वाय-फाय राऊटर
  5. कदाचित इंटरनेट
  6. आणि अर्थातच ‘वीज’ (Electricity)

आपला स्मार्टफोन आणि लॅपटॉप वाय-फाय राऊटरशी जोडून घ्या. आपण जर इंटरनेटसाठी घरी वाय-फाय राऊटरचा वापर करत असला, तर ही उपकरणे कदाचित आधिपासूनच राऊटरशी जोडलेली असतील. आता आपल्या स्मार्टफोनवर ‘एअरड्रॉईड’सारखा (AirDroid) एखादा अनुप्रयोग स्थापित करा. हा अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवरील कॅमेरॅचा वापर करेल व त्यातून दिसणारे दृष्य हे वाय-फाय राऊटरच्या सहाय्याने प्रसारित करेल. याकरिता इंटरनेटची आवश्यकता नाही. पण वाय-फाय राऊटरच्या रेंजबाहेर दूरच्या अंतरावर जर कॅमेरॅतून दिसणारे दृष्य पहायचे असेल, तर त्यासाठी मात्र गतीमान इंटरनेटची आवश्यकत भासेल.  त्यामुळेच वर आवश्यक गोष्टींची यादी लिहिताना मी ‘कदाचित इंटरनेट’ असे लिहिले आहे.

CCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर
स्मार्टफोनचा CCTV कॅमेरा किंवा बेबी मॉनिटर म्हणून वापर

अगदी थोडक्यात सांगायचे तर, ‘स्मार्टफोनच्या कॅमेरॅतून दिसणारे दृष्य त्यावरील खास अनुप्रयोगाच्या सहाय्याने वाय-फाय राऊटर प्रसारित करेल व ते आपल्याला आपल्या लॅपटॉपवर पाहता येईल. आणि अर्थातच या सर्व कामासाठी आपल्याला ‘वीज’ (Electricity) लागेल’. कालांतराने आपण यासंदर्भात विस्ताराने माहिती घेऊ.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.