इंटरनेट आणि बातम्या

आपल्या आसपासच्या घडामोडी जाणून घेणे आणि त्यानुसार आपले भवितव्य सुरक्षित करणे यासाठी बातम्या महत्त्वाच्या आहेत. मुख्य बातम्या ऐकाव्यात, निरपेक्ष तज्ञांचे त्यावरील मत जाणावे, त्याधारे बातम्या समजून घ्याव्यात, आणि सोडून द्याव्यात. दैनंदिन मालिकांऐवजी आपण टिव्हीवरील बातम्या पाहतो याचा अनेकजण अभिमान बाळगतात! प्रत्यक्षात त्यात अभिमान बाळगावेसे काहीही नाही. उलट स्वतःबरोबरच घरातील लोकांचे मनःस्वास्थ्य बिघडवण्याचा हा प्रकार आहे. टिव्हीवर दिवस दिवस एकच विषय चघळला जातो, ज्यातून अखेर काहीही निष्पण्ण होत नाही. कारण एखाद्या विषयावर तज्ञ लोक काय म्हणतात? यापेक्षा केवळ वाद-प्रतिवाद चिघळत ठेवणे यातच वृत्तवाहिन्यांना अधिक स्वारस्य असते.

मी सहसा कोणती वृत्तवाहिनी पहात नाही वा वर्तमानपत्रही वाचत नाही. कारण त्याची फारशी आवश्यकताच जाणवत नाही. जी बातमी चर्चा होण्याइतपत महत्त्वाची असते ती ट्विटरच्या माध्यमातून माझ्यासमोर येते. इथे निरनिराळ्या विचारसरणीचे लोक असल्याने त्या बातमीचे विविध पैलू मला आपसूकच दिसून येतात. शिवाय त्यामागील राजकिय पक्षांची भूमिकाही लक्षात येते. सर्व वृत्तवाहिन्यांची व वर्तमानपत्रांची सोशल नेटवर्कवर खाती आहेत. त्यापैकी क्वचितच कोणाचे मी अनुसरण करत असेन! कारण अनावश्यक, नकारात्मक आणि टाकाऊ बातम्या माझ्यासमोर याव्यात असे मला वाटत नाही. जर एखाद्या तज्ञाने वर्तमानपत्राच्या माध्यमातून एखाद्या विषयावर प्रकाश टाकला असेल, तर त्या तज्ञाचा दृष्टिकोन समजून घेणे मला गरजेचे वाटते. पण आज सर्व मराठी वर्तमापत्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्यासाठी खास वर्तमानपत्र लावण्याची आवश्यकता नाही.

इंटरनेट आणि बातम्या
इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या या अगदी सहजतेने जाणून घेता येतात

मराठी वृत्तवाहिन्यांवरील मुलाखती मात्र चांगल्या असतात. त्यातून जीवनास प्रेरणा मिळते, काही शिकायला मिळतं! पण या सर्व मुलाखती युट्यूबवर असल्याने त्या खास टिव्हीवर पाहण्याची आवश्यकता उरत नाही. शिवाय टिव्हीवर तासभर चालणारा कार्यक्रम हा युट्यूबवर जाहिरातींअभावी साधारण ४० मिनिटांत संपतो. त्यामुळे वेळही वाचतो! जर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एखाद्या घटनेचे थेट प्रेक्षेपण पहायचे असेल, तर ते देखील युट्यूबवर पाहणे शक्य आहे. दोन मराठी वृत्तवाहिन्या या युट्यूबवर थेट पाहता येतात. आज परदेशातील बहुतांश लोक बातम्या मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात आणि येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातही हेच चलन पहायला मिळेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.