लाय-फाय म्हणजे काय?

इथे मी ‘वाय-फाय’च्या ऐवजी ‘लाय-फाय’ हे काही चुकून लिहिलेले नाही! मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे! वाय-फाय आणि लाय-फाय हा दोहोंचा उपयोग हा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. पण यासाठी तंत्रज्ञान मात्र निरनिराळे वापरले जाते. ‘वाय-फाय’मध्ये (Wi-Fi) माहिती पाठवण्यासाठी ‘रेडिओ लहरीं’चा (Radio Waves) उपयोग केला जातो, तर ‘लाय-फाय’मध्ये (Li-Fi) त्यासाठी ‘दृष्य लहरी’ (Visible Light) वापरल्या जातात. वाय-फाय तंत्रज्ञान सध्या सर्वत्र प्रचलित आहे, पण लाय-फाय मात्र प्रायोगिक अवस्थेत आहे. वाय-फाय तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल म्हणून सध्या लाय-फाय तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. पण त्याची व्यवहारिकता मात्र काळाच्या कसोटीवरच सिद्ध होईल.

लाय-फाय
लाय-फाय तंत्रज्ञानात माहितीची देवाण-घेवाण प्रकाशाच्या माध्यमातून केली जाते

लाय-फाय तंत्रज्ञान थोडक्यात

लाय-फाय तंत्रज्ञानात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपल्या डोळ्याला दिसणार्‍या प्रकाशाचा वापर केला जातो. त्यासाठी LED दिवा उपयोगात येतो. या दिव्यातून बाहेर पडणार्‍या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करुन माहिती पाठवली जाते. प्रकाशाच्या तीव्रतेत होणारा हलक्यातला हलका बदल ओळखू शकेल असे उपकरण पाठवलेली माहिती गोळा करते. अशाप्रकारे प्रकाशाच्या माध्यमातून माहितीचे आदन-प्रदान हे अत्यंत वेगवाग गतीने व परिणामकारकतेने शक्य होते. प्रकाशाच्या तीव्रतेत होणारा हा बदल इतका सूक्ष्म असतो की, तो आपल्या डोळ्यांना जाणवतही नाही.

लाय-फायमुळे वाय-फाय नेटवर्कसंदर्भात जाणवणार्‍या सुरक्षेच्या काही समस्या सुटू शकतात. उदाहरणार्थ, काही ठिकाणी काही अपरिहार्य कारणास्तव रेडिओ लहरींना मज्जाव असतो, तेंव्हा अशा ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण शक्य आहे. शिवाय रेडिओ लहरी या भिंतीतून आरपार जाऊ शकतात, पण प्रकाशाच्या दृष्य लहरी या भिंतीला भेदू शकत नाही. तेंव्हा वाय-फाय प्रमाणे लाय-फायची रेंज ही भिंत ओलांडून पुढे न जाता घराच्या चार भिंतीत सुरक्षित राहते. अशाने हॅकर्सकडून नेटवर्कचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता कमी होते.

लाय-फायमुळे इंटरनेटच्या दर्जात्मक अनुभवात काही क्रांतिकारक बदल घडून येण्याची शक्यता आहे. पण लाय-फाय तंत्रज्ञान वाय-फायची जागा पूर्णतः भरुन काढेल, असे मला वाटत नाही. तरी हे दोन्ही तंत्रज्ञान भविष्यात ऐकमेकांस पुरक असे काम करतील.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.