व्हॉट्सअॅप संदेश मेमरी कार्डवर घेणे
जे लोक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एखादा ग्रुप चालवतात किंवा जे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी आहेत, त्यांच्यासाठी आज मी ही माहिती देत आहे. कारण सहसा ग्रुपच्या माध्यमातूनच संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण चालते आणि त्यामुळे मग कालांतराने आपला स्मार्टफोन हँग होऊ लागतो.
व्हॉट्सअॅपवरुन आलेल्या चित्रफिती, ध्वनिफिती किंवा छायाचित्रे जर स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवली जात असतील, तर आपल्या स्मार्टफोनवरील ताण वाढतो. कारण आपल्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी ही मर्यादीत असते. म्हणूनच व्हॉट्सअॅपवरुन येणारे संदेश हे मेमरी कार्डवर साठवणे गरजेचे बनते.
व्हॉट्सअॅप संदेश मेमरी कार्डवर हलवणे
मजकूराच्या (Text) माध्यमातून जे संदेश प्राप्त होतात ते मेमरी कार्डवर हलवण्याची गरज नाही. मुख्यतः चित्रफीत (Video), छायाचित्र (Image) प्रकारातील जे संदेश आहेत, त्यांस अधिकची मेमरी लागते. त्यामुळे आपण केवळ या प्रकारचे संदेश हे मेमरी कार्डवर हलवणार आहोत.
अशाप्रकारचे संदेश हे आपल्या स्मार्टफोनवरील एका स्वतंत्र फोल्डरमध्ये साठवले जातात. इंटरनल मेमरी मधील हे व्हॉट्सअॅप फोल्डर एक्सटरनल मेमरी, म्हणजेच मेमरी कार्डवर हलवल्यास इंटरनल मेमरीमधील जागा मोकळी होईल, आणि त्यानंतर आपला स्मार्टफोन हँग होणार नाही.
नोंद –
- व्हॉट्सअॅपमार्फत आलेल्या चित्रफिती, छायाचित्रे हे मेमरी कार्डवर घेतल्यानंतर ते आपल्या मेमरी कार्डवर सुरक्षित राहतील व ते आपणास फोटो गॅलरीमध्ये देखील दिसतील; पण ते आपणास व्हॉट्सअॅपवर दिसणार नाहीत. जिथे पूर्वी चित्रफीत, छायाचित्र होते, तिथे केवळ अस्पष्ट चौकट दिसेल.
- सगळ्यांचेच व्हॉट्सअॅप संदेश हे आपोआप इंटरनल मेमरीवर साठवले जातात असे नाही. तेंव्हा आपल्या स्मार्टफोनवर जर भरपूर व्हॉट्सअॅप संदेश असतील आणि त्यामुळेच आपला स्मार्टफोन हँग होत आहे, असं आपल्याला वाटत असेल, तरच या पद्धतीचा अवलंब करावा. आपला फोन हँग होत नसल्यास या पद्धतीचा तसा अवलंब करण्याची आवश्यकता नाही.
- व्हॉट्सअॅपवरुन आलेल्या चित्रफितींचा, ध्वनिफितींचा आणि छायाचित्रांचा जर संगणकावर बॅकअप घ्यायचा असेल, तर अशावेळी देखील ही पद्धत उपयोगी पडेल.
File Manager मधून Internal Memoryचा विभाग उघडा. यात Whatsapp नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. त्यात पुन्हा Media नावाचे फोल्डर असेल, त्यावर स्पर्श करा. इथे आपणास Whatsapp Audio, Whatsapp Images, Whatsapp Video, अशा निरनिराळ्या फोल्डर्सची यादी दिसेल. त्यापैकी Whatsapp Video हे फोल्डर प्रथम उघडा व तिथे दिसणारे सर्व संदेश कॉपी करुन मेमरी कार्डवरील एखाद्या फोल्डर मध्ये घ्या. त्यानंतर पुन्हा Whatsapp Video या फोल्डरमध्ये येऊन तेथिल चलचित्रे डिलीट करा. आपणास हे सारे जर व्यवस्थित जमत असेल, तर कॉपी-पेस्ट-डिलीट करण्याऐवजी थेट कट-पेस्ट केले तरी चालेल.
पण व्हॉट्सअॅपवरील संदेश हे मुळातच इंटरनल मेमरी ऐवजी आपोआप मेमरी कार्डवर साठवले जावेत याकरीता ‘मेमरी कार्डवर आपोआप माहिती साठवणे’ हा लेख वाचा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016