गूगल शोध परिणाम आपोआप नवीन टॅबमध्ये
हळूहळू ‘गूगल’ हे संकेतस्थळ आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. गूगल हे ज्ञानाच्या कल्पतरुप्रमाणे आहे. एखादा विचार आपण त्याजवळ व्यक्त केला की, त्यासंदर्भातील माहिती तो आपल्यासमोर घेऊन येतो. इंटरनेटच्या अथांग विश्वात न हरवता भटकायचे असेल, तर गूगल शिवाय पर्याय नाही.
गूगलमध्ये शोध घेतला असता, गूगल आपल्यासमोर शोध परिणाम (Search Results) घेऊन येतो. शोध परिणामात संकेतस्थळांच्या धाग्यांची (Website Links) एक यादी असते. या यादीतील कोणत्याही एका धाग्यावर क्लिक केल्यास एखादे संकेतस्थळ उघडले जाते. पण हे संकेतस्थळ वेब ब्राऊजरमधील शोध परिणाम असलेल्या टॅबमध्येच उघडले जाते. त्यामुळे परिणाम यादीतील दुसरे संकेतस्थळ उघडायचे झाल्यास पुन्हा पाठीमागे फिरुन (Back Button) शोध परिणामांच्या पानावर यावे लागते. ही एक वेळखाऊ व गैरसोयीची प्रक्रिया आहे.
यावरील एक तात्पुरता उपाय म्हणजे संकेतस्थळाच्या धाग्यावर संगणकाचा माऊस नेऊन राईट क्लिक करावे आणि त्यानंतर Open Link in New Tab या पर्यायाची निवड करावी. अशाने प्रस्तुत संकेतस्थळ हे एका नवीन टॅबमध्ये उघडले जाईल व शोध परिणामांचे पान हे पहिल्या टॅबमध्ये सुरक्षित राहिल. त्यामुळे त्यानंतर दुसरे संकेतस्थळ उघडणे सोपे होईल. पण या पद्धतीचा अवलंब केल्यास शोध परिणामातील प्रत्येक धागा हा राईट क्लिकच्या सहाय्याने उघडावा लागेल, आणि तेही तसं गैरसोयीचंच ठरेल.
म्हणूनच गूगल शोध परिणामातील कोणत्याही एका धाग्यावर क्लिक केल्यास प्रस्तुत संकेतस्थळ हे आपोआप नवीन टॅबमध्ये उघडले जाईल अशी तजवीज आपल्याला करावी लागेल.
शोध परिणामतील धागे आपोआप नवीन टॅबमध्ये उघडावेत याकरिता पायर्या
मी स्वतः अधिकतर मराठी गूगल वापरतो. त्यामुळे खालील प्रक्रिया ही मराठी गूगलच्या अनुशंगाने दिलेली आहे.
- गूगलमध्ये कोणताही एखादा शोध घ्या. अशाने शोध परिणामाचे पान आपल्यासमोर उघडले जाईल.
- पानाच्या उजव्या बाजूला वर कोपर्यात आपल्याला सेटिंग्जचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
- समोर जी पर्यायांची यादी येईल त्यातील ‘प्राधान्ये’ (Preferences) या पहिल्याच पर्यायावर क्लिक करा.
- सेटिंग्जच्या पानावर आपल्याला हा पर्याय दिसेल – इथे परिणाम उघडतात. त्याखाली दिसणारा ‘प्रत्येक निवडलेला परिणाम नवीन विंडोमध्ये उघडा’ हा पर्याय निवडा, टिक मार्क करा.
- बदल जतन करा.
आता शोध परिणामामध्ये दिसणार्या संकेतस्थळांचे धागे हे क्लिक करताच आपोआप नवीन टॅबमध्ये उघडले जातील. अशाने गूगलचा वापर करणे हे अधिक सोयीचे होईल.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016