सभोवताल दाखवणारी चित्रफीत
भूतकाळावर नजर टाकली असता कॅमेरॅच्या गुणवत्तेसोबतच चित्रफितींचा दर्जा देखील वधारलेला दिसतो. आजकाल तर चित्रफितीच्या प्रकारातही बदल घडू लागला आहे. 3D चित्रपट हे या बदलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपली नेहमीची चित्रफीत ही द्विआयामी असते. म्हणजेच त्या चित्रफितीला केवळ ‘लांबी’ आणि ‘उंची’ असते. त्रिआयामी (3D) चित्रफितीला मात्र ‘लांबी’ आणि ‘उंची’ सोबतच ‘खोली’ देखील असते. यामुळे 3D चित्रफितीची परिणामकारता वाढीस लागते व त्यात दर्शवलेले जग हे नेहमीच्या 2D चित्रफितीपेक्षा अधिक खरे भासते. पण 3D चित्रफितीसही यासंदर्भात एक मर्यादा आहे! आपणास स्क्रिनवर दिसणारे जग हे एका विशिष्ट दिशेने दाखवण्यात आलेले असते. त्या दिशेच्या उजवीकडे, डाविकडे, वर, खाली, ज्या काही घडामोडी घडत असतील, त्या काही आपल्याला दिसत नाहीत.
सत्य आणि आभासातील फरक कमी करायचा असेल, तर आपल्याला अशा एखाद्या चित्रफितीची गरज आहे, जी आपल्याला ३६० अंशातून, म्हणजेच सर्वदिशांतून हे जग दाखवेल. पण अशाप्रकारची चित्रफित निर्माण व्हायला आणखी किती वर्षं वाट पहावी लागेल!? गंमत म्हणजे त्यासाठी अगदी एक क्षणही वाट पाहण्याची गरज नाही. मी खाली त्याप्रकारची एक चित्रफीत जोडत आहे. ही चित्रफीत आपणास भोवतालचे जग हे अगदी ३६० अंशातून दाखवेल!
सर्वदिशांचे चित्रिकरण करणार्या आधुनिक कॅमेरॅच्या सहाय्याने ही चित्रफीत तयार करण्यात आलेली आहे. आपण जर स्मार्टफोनवरुन ही चित्रफीत पहात असाल, तर चित्रफितीची दिशा ही आपण आपल्या बोटाने बदलू शकाल. आपण जर संगणकाचा वापर करत असाल, तर चित्रफितीची दिशा बदल्यासाठी माऊसचा वापर करावा. चित्रफीत ही शक्यतो HDमध्ये, म्हणजेच अधिक चांगल्या दर्जाने पहावी. अशाप्रकारच्या अनेक चित्रफिती या सध्या युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यावर 360 degree video असा शोध घ्यावा. ज्या चित्रफितीच्या वर डाव्या बाजूस दिशादर्शक गोल असेल, ती ३६० अंशात पाहता येईल.
3D आणि 360 Degree तंत्रज्ञान एकत्र केल्यास भविष्यातील चित्रफित कशी असेल? याचा आपणास सर्वसाधारणपणे अंदाज येऊ शकतो. चित्रफितीचे तंत्रज्ञान पुढे इतके विकसित होईल की, त्यानंतर ‘सत्य’ आणि ‘आभास’ यातील सिमारेषा ही अगदीच ‘अस्पष्ट’ होईल.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016