गूगल टास्क्स्‌ – सुनियोजित कामांची यादी

मानवी मेंदू हा एकावेळी एकाच गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करु शकतो. त्यामुळे आपल्याला आपली कामे ही एक एक करुन क्रमाक्रमाने पूर्ण करावी लागतात. पण आजकालचं जीवन हे इतकं धकाधकीचं आहे की, अनेकदा एक काम पूर्ण करायच्या नादात आपण दुसरं काम विसरुन जातो. त्यामुळे आपल्याला जी काही कामे करायची आहेत, ती आपण कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवायला हवीत. म्हणजेच आपल्या सुनियोजित कामांची एक यादी करायला हवी. यालाच ‘टू डू लिस्ट’ (To Do List) असे म्हणतात. गूगलने ‘गूगल टास्क्स्‌’च्या (Google Tasks) माध्यमातून आपल्याला अशी सोय करुन दिलेली आहे.

‘गूगल टास्क्स्‌’ वापरुन सुनियोजित कामांची यादी तयार करण्याचा पर्याय हा ‘जीमेल’मध्ये देण्यात आलेला आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक ‘जीमेल’चा वापर करतात. तेंव्हा आपण कदाचित Google Tasks हा पर्याय जीमेलमध्ये पाहिला असेल. जर पाहिला नसेल, तर gmail.com उघडा. लॉग-इन करा. स्क्रिनच्या डाव्या बाजूला अगदी वर कोपर्‍यात आपल्याला Gmail असं लिहिलेलं दिसेल (Google चिन्हाच्या खाली), त्यावर क्लिक करा. आपल्याला Tasks नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता स्क्रिनच्या उजव्या बाजूला खाली कोपर्‍यात चॅटसारखी एक खिडकी उघडली जाईल. तिथे दिलेल्या जागी आपल्याला एक एक करुन आपली कामे लिहून ठेवता येतील. नवीन काम जोडायचे झाल्यास अधिक (+) चिन्हाचा वापर करावा. एखादे काम हटवायचे झाल्यास डिलिट चिन्हाचा वापर करावा. जोडल्याला प्रत्येक कामाच्या (Task) समोर आपल्याला एक चौकट दिसेल. त्या चौकटित क्लिक करताच ते काम पूर्ण झाल्याचे नमूद होईल (Tick Mark). कामांची यादी प्रिंट करणे, ईमेलने पाठवणे यासाठीचे पर्याय हे Actions मध्ये देण्यात आले आहेत.

गूगल टास्क्स्‌ - जीमेल
जीमेलमध्ये उघडलेली गूगल टास्क्स्‌ची खिडकी

जोडलेल्या कामाची तारिख आपण पर्यायांमधून सुनिश्चित करु शकतो. शिवाय त्या कामासंदर्भात काही अधिकचे नोंद करुन (Note) ठेवायचे असेल, तर त्याची देखील सोय करुन देण्यात आलेली आहे. आपण फाईल जशा वेगवेगळ्या फोल्डरमध्ये जमा करतो, तशाप्रकरे निरनिराळी कामे (Tasks) ही निरनिराळ्या यादीमध्ये (List) जोडता येतात. ‘गूगल टास्क्स्‌’ हा एक साधा-सोपा आणि मोफत ‘टास्क मॅनेजर’ आहे. जीमेलमध्ये न जाता जर आपल्याला ‘गूगल टास्क्स्‌’चा वापर करायचा असेल, तर ‘टास्क्स्‌ कॅनव्हास’ला भेट द्या.

गूगल टास्क्स्‌ - कामासंदर्भातील पर्याय
गूगल टास्क्स्‌मध्ये जोडलेल्या कामासंदर्भातील इतर पर्याय

तेंव्हा यापुढे कामाच्या रगाड्यात एखादे महत्त्वाचे काम विसरुन जाऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल, तर ‘गूगल टास्क्स्’चा आवर्जून वापर करा. अशाने आपल्या कामांचे व्यवस्थित नियोजन होईल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.