कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन
काल आपण रेझिस्टिव्ह टचस्क्रिनबाबत अगदी थोडक्यात माहिती पाहिली, आणि सोबतच तशाप्रकारच्या टचस्क्रिनचे फायदे आणि मर्यादादेखील जाणून घेतल्या. आज आपण कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन संदर्भात थोडाफार अंदाज घेणार आहोत. कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन समजून घेणं काहीसं गरजेचं आहे, कारण आजकालच्या स्मार्टफोनमध्ये अशाप्रकारच्या टचस्क्रिनचा सर्रास वापर होताना पहायला मिळतो. तेंव्हा पुढीलवेळी एखाद्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पहात असताना जर आपल्या नजरेखालून कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन हा शब्द गेला, तर आपल्याला त्याबाबत थोडंतरी माहित असेल.
कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन तंत्रज्ञान
अशाप्रकारच्या टचस्क्रिनमागचे विस्तृत विज्ञान या इथे सांगण्यात काही अर्थ नाही. पण थोडक्यात सांगायचे तर, मानवाचे शरीर हे विद्युत प्रवाहाकरिता पुरक आहे. कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनमध्ये या गोष्टीचा उपयोग करुन घेतला जातो. स्क्रिनला स्पर्श केल्याने स्क्रिनअंतर्गत पसरलेल्या विद्युतक्षेत्रात जो हलकासा बदल होतो, तो मोजला जातो, आणि स्क्रिनवर स्पर्श झालेले ठिकाण हे निश्चित केले जाते.
कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनचे फायदे
- कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनचा प्रतिसाद हा रेझिस्टिव्ह टचस्क्रिनपेक्षा अधिक चांगला असतो.
- कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनचा डिस्प्ले अधिक सुस्पष्ट असतो.
- अशाप्रकारच्या स्क्रिनवर एकाचवेळी एकाहून अधिक ठिकाणी स्पर्श केला असता (multi-touch), स्पर्शबिंदू अधिक व्यवस्थित ओळखले जातात.
कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिनच्या मर्यादा
- कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन रेझिस्टिव्ह टचस्क्रिनपेक्षा महाग आहे.
- रेझिस्टिव्ह टचस्क्रिनप्रमाणे केवळ हलकासा भार निर्माण केल्याने अशाप्रकारची स्क्रिन प्रतिसाद देत नाही. कॅपॅसिटिव्ह स्क्रिन वापरण्याकरिता एखादी विद्युतवाहक गोष्ट लागते. त्यामुळे आपण जर हातात ग्लोव्हज् घातले असतील, तर कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन प्रतिसाद देणार नाही.
आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन रेझिस्टिव्ह आहे की कॅपॅसिटिव्ह? आत्ता लगेच तपासून पहायचे आहे? एक पेन्सिल, पेन किंवा ज्यातून विद्युतप्रवाह वहात नाही, अशी कोणतीही एखादी गोष्ट घ्या आणि तिचा आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनला स्पर्श करा. जर आपल्या स्मार्टफोनने प्रतिसाद दिला, तर ती रेझिस्टिव्ह स्क्रिन आहे, आणि जर स्मार्टफोनने प्रतिसाद दिला नाही, तर ती कॅपॅसिटिव्ह स्क्रिन आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016