मराठीचा इंटरनेटवरील विकास

‘ज्ञान’ मिळवल्याने मानवी जीवनास एक नवी दृष्टी प्राप्त होते. पर्यायाने माणसाचा आध्यात्मिक तसेच आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पूर्वी काहीजणांपुरते मर्यादित असलेले ‘ज्ञान’ हे इंटरनेटमुळे आता सर्वांपर्यंत पोहचले आहे. ज्याला कोणाला म्हणून ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी इंटरनेटरुपी महासागर आज खुला आहे. परंतु यात एक छोटासा अडसर आहे! एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवायचे झाल्यास त्यासाठी इंग्लिश भाषा अवगत असणे गरजेचे आहे. ज्यांना इंग्लिश भाषा येत नाही, त्यांना सखोल शिक्षणापासून वंचित रहावे लागते. तेंव्हा विकासाची नदी सर्वांपर्यंत पोहचावी याकरिता आपली मराठी भाषा ‘ज्ञानभाषा’ होणे अत्यावश्यक आहे. परंतु कोणतीही गोष्ट अर्थकारणाच्या व्यवहारिक चौकटीत बसवल्याखेरिज तिला मूर्तरुप येत नाही. तेंव्हा ‘ज्ञानार्जन’ आणि ‘अर्थार्जन’ अशा दोन्ही बाजूंनी मराठीच्या भवितव्याचा विचार व्हायला हवा. विशेष म्हणजे मराठी भाषिकांनी मनावर घेतल्यस मराठीचा, पर्यायाने आपला स्वतःचा उत्कर्ष साधने सहजशक्य आहे!

मराठी शोध परिणाम – मराठी गूगल

इंटरनेटची सुरुवातच मुळी ‘सर्च इंजिन’पासून होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधायची झाल्यास आज बहुतांश लोक गूगलचा वापर करतात. परंतु आपल्यापैकी किती लोक ‘मराठी गूगल’चा वापर करतात!? हा खरा प्रश्न आहे! ‘मराठी गूगल’चा वापर करायचा झाल्यास गूगलच्या शोध चौकटीखाली (Search Box) देण्यात आलेला ‘मराठी’ भाषेचा पर्याय निवडावा. आपल्या मनामधील प्रश्नाचे उत्तर जर मराठी भाषेतून हवे असेल, तर मराठी गूगलच्या शोध चौकटीत मराठी ‘सारशब्द’ (Keywords) टाकावेत. त्याकरिता Google Indic Keyboard (अँड्रॉईडसाठी) आणि Google Input Tools (संगणकासाठी) हे गूगलचे मोफत मराठी कीबोर्ड वापरता येतील. मराठीमधून शोध घेतल्याने मराठी शोध परिणाम आपल्यासमोर दिसू लागतात. परंतु त्याचवेळी त्यात काही हिंदी शोध परिणामांची देखील रसमिसळ झालेली असू शकते. मराठी व हिंदी या दोन्ही भाषांकरिता देवनागरी लिपीचा वापर होत असल्याने असे होत असावे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु हिंदी गूगलमध्ये शोध घेतला असता एकही मराठी शोध परिणाम समोर येत नाही; शिवाय ‘ळ’ हे अक्षर आणि मराठी शब्द यांच्या सहाय्याने गूगलला इंटरनेटवरील मराठी पान ओळखणे सहजशक्य आहे.

मराठी गूगल
इंटरनेटवर मराठीमधून शोध – गूगलची मराठी आवृत्ती – मराठी गूगल

मराठी गूगलमध्ये शोध घेतल्यानंतर जर एखाद्यास इंटरनेटवरील मराठी पान सापडणार नसेल, तर अशाने मराठीची मोठी पिछेहाट होईल. गूगल सर्वसामान्य वापरकर्त्यांची फारशी दखल घेताना दिसत नाही, तेंव्हा महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने यादृष्टीने गूगलकडे योग्य तो पाठपुरावा करायला हवा.

मराठी पानांची संख्या – आर्थिक चौकट

मराठी गूगलच्या माध्यमातून इंटरनेटवरील मराठी पाने सापडू लागल्यास हळूहळू लोक मराठी गूगलचा नियमितपणे वापर करु लागतील. आता इंटरनेटवर मराठीमधून अधिकाधिक माहिती कशी उपलब्ध होईल? याबाबत विचार करायला हवा. आज मराठीमधून लेखन करण्यास अनेक लोक तयार आहेत. परंतु त्याकरिता त्यांना वेळ मिळत नाही, कारण अर्थार्जनासाठी त्यांना नोकरी करावी लागते. सुमारे १० करोड लोकांना मराठी भाषा अवगत आहे. असे असूनही एखादे मराठी संकेतस्थळ वा अनुदिनी आर्थिकदृष्ट्या तग धरु शकत नाही, हे अत्यंत दूर्देवी आहे! इंटरनेटवर मराठी भाषेचा विकास व्हावा याकरिता मराठी संकेतस्थळांना आर्थिक चौकट मिळायला हवी. यासाठी काय करता येईल?

सर्वप्रथम इंटरनेटची दर्जेदार सुविधा अत्यंत रास्त दरात महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात पोहचायला हवी. त्यानंतर लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यास शिकवता येईल. ऑनलाईन व्यवहाराचे फायदे समजावून सांगत त्यादृष्टीने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जनजागृतीकरिता सरकारी माध्यमातून याबाबत काही उपक्रम राबवता येतील. याचा निरनिराळ्या सरकारी कार्यक्रमांना देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होईल. इंटरनेटवरुन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाल्यास मराठी संकेतस्थळांना अर्थार्जनाचे साधन मिळेल. अशाने त्यांना आपल्या संकेतस्थळाच्या वाढीवर भर देता येईल. परिणामी इंटरनेटवरील मराठी पानांच्या संख्येत मोठी भर पडेल. मराठीमधून हवी ती माहिती उपलब्ध होऊ लागल्यास मराठीमधून शोध घेण्याचे प्रमाण वाढेल. एकंदरितच इंटरनेटवरील मराठी संस्कृतीस गती मिळेल व तिचे आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण होईल.

भाषांतर – गूगल ट्रांसलेट

मराठीसाठी उत्स्फुर्तपणे योगदान देण्याची इच्छा असणारे अनेक तरुण सोशल मिडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आता त्यांना एखाद्या निश्चित अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने भाषांतराचे संघटित उपक्रम नित्यनेमाने आयोजित करता येतील. अशा उपक्रमांना आकार देण्यासाठी इंटरनेटवर एक समुह तयार करावा. या समुहात भाषांतरविषयक गोष्टींवर सर्वांगीण चर्चा होईल, तसेच सदस्यांमार्फत भाषांतराचे उपक्रम संघटितपणे मोठ्या प्रमाणावर राबवले जातील. भाषांतराच्या उपक्रमांमध्ये ‘गूगल ट्रांसलेट’ हा प्रकल्प केंद्रस्थानी असावा. कारण या प्रकल्पाच्या माध्यमातून इंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत आपोआप भाषांतरित करता येते. सध्या गूगल ट्रांसलेटच्या माध्यमातून होणारे मराठी भाषांतर बाल्यावस्थेत असले, तरी आपल्या योगदानाने त्यात वरचेवर सुधारणा होत जाईल. इंटरनेटवरील कोणतेही पान मराठीमध्ये वाचता आले, तर मराठी भाषेचे भविष्य सुरक्षित होईल.

गूगल ट्रांसलेट सोबतच संकेतस्थळ, अनुप्रयोग, चित्रफिती यांचे भाषांतर आपणास हाती घेता येईल. तंत्रज्ञानविषयक अनेक संकल्पना अजूनही समाजात पुरत्या रुजायच्या आहेत, तसेच त्यादृष्टीने समोर आलेल्या अनेक मराठी प्रतिशब्दांना सर्वमान्यता मिळायची आहे. प्रतिशब्द देण्याची प्रक्रिया पूर्णतः मुक्त वातावरणात पार पडावी. त्यासाठी कोणतीही मतमोजणी अथवा ठराव करु नयेत. एखाद्या संकल्पनेविषयी ज्याला जो प्रतिशब्द सुचेल, तो त्याने समोर आणावा. लोकांना जर तो प्रतिशब्द आवडला, तर तो आपोआपच चलनात येईल. याशिवाय भाषांतरविषयक समुहातील सदस्यांनी तज्ञांच्या मदतीने वेळ मिळेल तसा स्वतःचा मराठी शब्दकोश घडवावा. त्यासाठी विकिपीडियाच्या विक्शनरी या संकेतस्थळाचा वापर करता येईल, किंवा एखादे स्वतंत्र संकेतस्थळ बनवता येईल.

सामाजिक दृष्टिकोन – भाषिक आग्रह

एखाद्या व्यक्तिने कोणती भाषा वापरावी!? हा त्या व्यक्तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आपण कोणती भाषा वापरावी? हे मात्र पूर्णतः आपल्या हातात आहे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा सर्वत्र आत्मविश्वासाने वापर करावा. इथे ग्राहक व नागरीक म्हणून आपणास असणार्‍या हक्कांचा आग्रह धरावा. तसेच मराठीचा प्रसार व्हावा यासाठी आपले अधिकार पद योग्यरितीने उपयोगात आणावे. मराठीला अर्थकारणाची जोड द्यायची झाल्यास आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होणे अत्यावश्यक आहे. मराठी भाषेच्या न्याय्य हक्कांविषयी जर कोणी लढत असेल, तर त्यास प्रोत्साहन द्यावे. ‘याने काय होईल!? त्याने काय होईल!?’ असा दृष्टीकोन न बाळगता मराठीसाठी शक्य ते निरपेक्षपणे करत रहावे. सातत्य आणि सकारात्मकता बाळगल्यास अपेक्षित बदल निश्चितपणे घडेल. मराठीचा, पर्यायाने आपला स्वतःचा उत्कर्ष साधायचा झाल्यास आपला सामाजिक दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.