प्रमाणवेळ म्हणजे काय?
सहसा कोणतेही संकेतस्थळ हे जागतिक स्तरावर काम करते. पण संबंध जगाचा विचार केला असता, एखाद्या देशात जेंव्हा सकाळ सुरु असते, त्याचवेळी दुसर्या देशात रात्र झालेली असते. त्यामुळे एखाद्या संकेतस्थळावर आपली माहिती भरत असताना आपल्याला आपली ‘प्रमाणवेळ’ विचारण्यात येते. तेंव्हा आपण + ५.३० अशी भारताची प्रमाणवेळ निवडतो. आता ‘प्रमाणवेळ’ हे जरी भुगोलातील प्रकरण असले, तरी यासंदर्भात प्रत्येकाला हलकीशी कल्पना असणे आवश्यक आहे. कारण जागतिकीकरणाच्या या काळात देशोदेशीच्या लोकांचा परस्पर संवाद वाढलेला आहे. अशावेळी ‘प्रमाणवेळ म्हणजे काय?’ यासंदर्भात थोडंफार सामान्यज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आपल्याला माहित आहे का!? पुण्यात सूर्य मावळला तरी तत्क्षणी तो मुंबईत मावळलेला नसतो. पुण्यात सूर्य मावळल्यानंतर मुंबईत तो सर्वसाधारणपणे ५ मिनिटांनंतर मावळतो. म्हणजे आपण पुण्यात सूर्य पूर्णतः मावळलेला पाहिला आणि मुंबईतील मित्राला लागलीच फोन करुन विचारले की, ‘सूर्य मावळला आहे का?’ तर तो ‘नाही’ असे उत्तर देईल. पृथ्वी गोल असल्याने सूर्य सर्व ठिकाणी एकाचवेळी मावळताना दिसत नाही. मुंबई – पुणे ही दोन जवळची शहरे असल्याने सूर्य मावळण्याच्या वेळांत केवळ पाचच मिनिटांचा फरक दिसून येतो. पण मुंबई – नागपूर या दोन दूरच्या अंतरावरील शहरांचा विचार केला असता सूर्य मावळण्याच्या वेळांत सुमारे अर्ध्या तासाचा फरक पडतो. म्हणजेच समजा की, भारतीय प्रमाणवेळेनुसार जर नागपूरमध्ये संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सूर्य मावळला, तर मुंबईत तो संध्याकाळी ६ वाजता मावळतो.
‘प्रमाणवेळ’ म्हणजे ‘सर्वांना मान्य असलेली एक वेळ’. + ५.३० ही भारतात सर्वांनी मान्य केलेली वेळ असून ती भारतातील सर्व राज्यांना लागू पडते. आता + ५.३० म्हणजे काय? तर इंग्लंडमधील ग्रिनविच या शहरात आत्ता दुपारचे बारा वाजले असतील, तर भारतात संध्याकाळाचे ५.३० वाजले आहेत, असे मानले जाईल. म्हणजेच इंग्लंडमधील ग्रिनविच शहरात जी काही वेळ असेल, त्याच्या अधिक + ५.३० तास. ही इंग्रजांनी केलेली व्यवस्था आहे. महाराष्ट्राची स्वतंत्रपणे प्रमाणवेळ काढायची झाल्यास ती अर्धा तास मागे जाईल. म्हणजेच घड्याळात जेंव्हा रात्रीचे १२ वाजतील, तेंव्हा प्रत्यक्षात रात्रीचे ११.३० झालेले असतील. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्ण काळात व त्यानंतरही काही काळ मुंबई, चैन्नई व कोलकाता या शहरांच्या प्रमाणवेळा वेगवेगळ्या होत्या. त्यावेळी मुंबईची प्रमाणवेळ + ४.५१, चैन्नईची प्रमाणवेळी + ५.२१, तर कोलकत्याची प्रमाणवेळ ही + ५.५४ तास अशी होती. त्यानंतर मात्र सर्वांच्या सोयीकरिता भारताच्या मधोमध असणार्या अलाहाबाद हा शहराला अनुसरुन भारताची सार्वत्रिक प्रमाणवेळ + ५.३० अशी निश्चित करण्यात आली.

प्रमाणवेळ ही अक्षांश आणि रेखांश यानुसार ठरवण्यात येते. त्यासंदर्भात विस्तृत माहिती द्यायची झाल्यास एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यामुळे या इथे मी त्याबाबात काही लिहित नाही. बाकी आपल्याला दशोदेशीच्या प्रमाणवेळा जर पहायच्या असतील, म्हणजेच एखाद्या देशात आत्ता किती वाजले आहेत? हे जर पहायचे असेल, तर आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये जे Clock (क्लॉक) नावाचे अॅप आहे, त्याचा वापर करावा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016