व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट म्हणजे काय?

आपल्या ग्राहकांशी एकत्रितपणे संपर्कात राहण्याकरीता व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘ब्रॉडकास्ट’ या वैशिष्ट्याचा व्यवसायिकांना चांगला उपयोग होऊ शकतो. ब्रॉडकास्टच्या माध्यमातून संदेश पाठवण्यासाठी आपण प्रथम एक यादी तयार करतो. त्यानंतर या यादीतील लोकांना आपण एकत्रितपणे एखादा संदेश पाठवतो. पण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ज्याप्रमाणे सर्वांना सर्वांचे फोन नंबर दिसतात, तसं ब्रॉडकास्टमध्ये दिसत नाहीत. ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पाठवलेला संदेश हा व्यक्तिगत स्वरुपात पाठवलेल्या संदेशाप्रमाणे असतो. त्यामुळे आपण जर छोटे व्यवसायिक असाल आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या संपर्कात रहात असाल, तर गोपनियतेच्या दृष्टीने ब्रॉडकास्टचा वापर करणे योग्य ठरते.

व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट यादी तयार करणे

  1. व्हॉट्सअ‍ॅप उघडा. व्हॉट्सअ‍ॅपचे पर्याय उघडा.
  2. New Broadcastवर स्पर्श करा.
  3. इथे आपल्याला एक यादी तयार करायची आहे. त्याकरीता दिलेल्या ठिकाणी काही संपर्कनावांचा (Contact Name) समावेश करा. सर्व संपर्क जोडल्यानंतर सरतेशेवटी CREATEवर स्पर्श करा. आपल्यासमोर चॅटचे पान उघडले जाईल.
  4. वर जिथे recipients असे लिहिले आहे, त्यावर स्पर्श करा. आपल्याला इथून ब्रॉडकास्ट यादीचे नाव बदलता येईल, नवीन संपर्क या यादीत जोडता येतील किंवा ही यादी हटवता (Delete) येईल.
  5. एखादा विशिष्ट संपर्क जर यादीतून काढायचा असेल, तर संपर्कनावावर दोन सेकंद स्पर्श करा. अशाने त्यासंदर्भातील काही पर्याय उघडले जातील. त्यात Remove from broadcast list असाही एक पर्याय असेल, त्याचा वापर करा.
व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट
व्हॉट्सअ‍ॅपवर ब्रॉडकास्ट यादी तयार करुन एकाचवेळी अनेकांच्या संपर्कात राहता येते.

ब्रॉडकास्ट यादीत समावेश असलेल्या एखाद्या व्यक्तिच्या स्मार्टफोनवरील संपर्कयादीत (Contact List) जर आपले नाव नसेल, तर त्या व्यक्तिस आपण ब्रॉडकास्ट केलेले संदेश मिळणार नाहीत. तेंव्हा ब्रॉडकास्ट यादीतील व्यक्तिच्या स्मार्टफोनवरील, टॅबवरील संपर्कयादीत आपला मोबाईल क्रमांक असायला हवा, तरच त्या व्यक्तिस आपले संदेश प्राप्त होतील.

गरज नसताना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणे शक्यतो टाळा! इतरांच्या गोपनियतेचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे. तेंव्हा कमीतकमी व्यवसायिकांनी तरी ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ऐवजी ब्रॉडकास्टचाच वापर करायला हवा.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.