अनुदिनीची थोडक्यात ओळख
पूर्वी लिखाणाद्वारे व्यक्त व्हायचे झाल्यास एखादे पुस्तक लिहावे लागायचे किंवा मासिक, वृत्तपत्र अशा माध्यमांचा आधार घ्यावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. इंटरनेटसारखे दमदार माध्यम हाती आल्यापासून व्यक्त होणे हे सर्वांनाच अगदी सहजशक्य झाले आहे. आपल्या मनातील भावना मांडण्यासाठी आज अनेकजण सोशल नेटवर्कचा वापर करतात. त्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इत्यादी माध्यमे उपयोगात आणली जातात. पण अशा माध्यमातून पुढे आलेल्या साहित्यास फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. शिवाय आपले विचारही कालोघात मागे पडतात, हरवून जातात. त्यामुळे जे मनःपूर्वक आपले विचार मांडतात, अशा सर्व लोकांनी ‘अनुदिनी’ म्हणजेच ‘ब्लॉग’ हे माध्यम वापरणे आवश्यक आहे.
‘अनुदिनी’ म्हणजे काय?
‘सोशल नेटवर्क’ हा जसा संकेतस्थळाचा (Website) एक प्रकार आहे, त्याचप्रमाणे ‘अनुदिनी’ (Blog) हा देखील संकेतस्थळाचाच एक प्रकार आहे. आत्ता आपण ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’ नावाच्या अनुदिनीवर प्रकाशित करण्यात आलेला लेख वाचत आहात. अनुदिनीवर दिवसाच्या अनुशंगाने लेख लिहिलेले असतात. त्यावरील प्रत्येक लेखास एक तारीख असते. सोशल नेटवर्कवर ज्याप्रमाणे आपण आपली स्थिती अद्यान्वित (Status Update) करतो, त्याचप्रमाणे अनुदिनीवर नवीन लेख (Blog Post) प्रकाशित करतो. ‘स्टेटस अपडेट’प्रमाणेच ‘ब्लॉग पोस्ट’ प्रकाशित केल्यानंतर त्यासोबत प्रकाशनाची तारीख दिसते. अनुदिनीवर प्रकाशित करण्यात आलेले नवीन लेख वर दिसतात, तर जुने लेख खाली जातात.
खालील चित्रात प्रसिद्ध मराठी संगितकार कौशल इनामदार यांची अनुदिनी दिसत आहे. या अनुदिनीच्या उजव्या बाजूला आपण अनुदिनीवरील लेखांचा कालानुक्रम (Blog Archive) पाहू शकतो. शिवाय ‘रात्रीचा चहा’ या लेखाच्या वर त्याची तारिख दिसत आहे. अशाप्रकारे अनुदिनीच्या माध्यमातून आपले विचार हे कालानुक्रमे व्यक्त होतात.

सोशल नेटवर्कवर असलेली अनेक बंधने ही अनुदिनीस लागू पडत नाहीत. अनुदिनीवरील प्रत्येक लेखाची गूगलसारख्या सर्च इंजिनद्वारे आपोआप दखल घेतली जाते. शिवाय अनुदिनीवरील लेखांतर्गत अगदी सहजतेने शोध घेता येतो. लेखामध्ये चित्रांचा योग्यप्रकारे वापर करणे, अक्षरे ठळक करणे, अधोरेखित करणे, इत्यादी अनेकानेक पर्याय अनुदिनीच्या निमित्ताने साध्य होतात. अनुदिनीचा एक मुख्य पत्ता असतो, शिवाय त्यावरील प्रत्येक लेखालाही एक पत्ता मिळतो. त्यामुळे अनुदिनीवरील एखादा लेख सोशल नेटवर्कच्या माध्यामातून सहजतेने वाटता (Share) येतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता लेखकांनी, कवींनी, समाजसुधारकांनी व्यक्त होण्यासाठी अनुदिनीचा वापर करायला हवा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016