अनुदिनी कशी तयार करावी?

‘अनुदिनी’ म्हणजे ‘ब्लॉग’. इंटरनेटवरुन व्यक्त होण्यासाठी अनुदिनी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मागच्या लेखात आपण ‘अनुदिनी म्हणजे काय?’ याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती. या लेखात आपण ‘अनुदिनी कशी तयार करावी?’ हे संक्षिप्त स्वरुपात पाहणार आहोत.

आजकाल जवळपास प्रत्येकजण ईमेल आणि सोशल नेटवर्कचा उपयोग करतो. जीमेलचा वापर करायचा असेल, तर प्रथम जीमेलवर एक खाते उघडावे लागते. फेसबुकचा वापर करायचा असेल, तर प्रथम फेसबुकवर एक खाते उघडावे लागते. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला जर एखादी अनुदिनी सुरु करायची असेल, तर त्यासाठी ‘ब्लॉगर’ किंवा ‘वर्डप्रेस’वर एक खाते उघडावे लागेल. कारण ‘ब्लॉगर’ आणि ‘वर्डप्रेस’ या सेवा अनुदिनीच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत.

ब्लॉगरवर अनुदिनी सुरु करणे

‘ब्लॉगर’च्या (Blogger) माध्यमातून अनुदिनी तयार करणे हे अगदी सहजशक्य आहे. ही सेवा गूगल मार्फत पुरवली जाते. blogger.com असा ‘ब्लॉगर’ या संकेतस्थळाचा पत्ता आहे. blogger.com या पत्त्यावर जाऊन एक खाते उघडा, म्हणजेच Register करा. आपण जर जीमेल वापरत असाल, तर नवीन खाते उघडण्याची गरज नाही. जीमेलचा Email ID आणि पासवर्ड ‘ब्लॉगर’साठी चालतो. त्यामुळे जीमेल वापरत असाल, तर थेट Sign In करा. New Blog वर क्लिक करा. Title, Address आणि Template निवडून Create blog! वर क्लिक करा. अशाने आपली अनुदिनी तयार होईल. माझी पहिली अनुदिनी ही मी ‘ब्लॉगर’वरच सुरु केली होती.

ब्लॉगर - अनुदिनी
ब्लॉगरवर अशाप्रकारे अनुदिनी तयार करता येते

वर्डप्रेसवर अनुदिनी सुरु करणे

‘वर्डप्रेस’ (WordPress) ही खास ‘अनुदिनी’साठी बनलेली अत्यंत लोकप्रिय सेवा आहे. wordpress.com असा ‘वर्डप्रेस’ या संकेतस्थळाचा पत्ता आहे. या संकेतस्थळावर जाऊन आपले एक खाते उघडावे, म्हणजेच Register करावे. खाते उघडल्यानंतर Log in करा. wordpress.com/start या पत्यावर जाऊन आपणास आपली अनुदिनी तयार करता येईल. अनुदिनी तयार करण्याच्या प्रक्रियेत तीन सोप्या पायर्‍या आहेत. प्रथम Theme निवडावी, त्यानंतर पत्ता निवडावा आणि Create My Site वर क्लिक करावे! अशाने ‘वर्डप्रेस’च्या माध्यमातून आपली अनुदिनी तयार होईल. अनुदिनी लिहिण्याकरिता वर्डप्रेस हे एक उत्तम माध्यम आहे.

इंटरनेटचे विश्व हे फेसबुक आणि व्हॉट्सॲप पुरतेच मर्यादित नाही. अनुदिनीसारख्या माध्यमातून आपणास इंटरनेटवर आपले हक्काचे व्यासपीठ निर्माण करता येते. अनुदिनी हा इंटरनेटवरील एक महत्त्वाचा घटक आहे. तेंव्हा अनुदिनीसंदर्भातील माहिती ही आपणास असायला हवी.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.