अ‍ॅप विकत का घ्यावे?

एखादी गोष्ट मोफत मिळत असेल, तर ते कोणाला आवडणार नाही? पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते, हे देखील तितकंच सत्य आहे. एखादी चांगली गोष्ट मोफत मिळत असेल, तर त्याचा अर्थ हा इतकाच ती त्यासाठीचे पैसे हे आपल्यातर्फे दुसरं कोणीतरी अप्रत्यक्षपणे चुकते करत आहे. यासाठी आपल्याला गूगल कीबोर्डचे उदाहरण घेता येईल. ‘गूगल कीबोर्ड’ (Google Keyboard) हे अ‍ॅप मोफत तर आहेच, शिवाय ते चांगले देखील आहे. गूगलला अप्रत्यक्षपणे इतर माध्यमांतून उत्पन्न मिळत असल्याने ते आपल्याला असे एखादे चांगले अ‍ॅप मोफत देऊ शकतात. जर त्यांना इतरत्र मिळणारे उत्पन्न बंद झाले, तर ते आपल्याला मोफत देत असलेल्या सेवादेखील बंद होतील.

जाहिराती आणि विक्री

पण प्रत्येक कंपनी ही गूगल इतकी मोठी नसते आणि त्यामुळे त्यांना गूगलप्रमाणे अप्रत्यक्ष उत्पन्न मिळू शकेलच असे नाही. समजा अशाच एका छोट्या कंपनीचे जर एखादे चांगले अ‍ॅप असेल, तर त्यांच्यासमोर त्यापासून उत्पन्न मिळवण्याचे सहसा दोन मार्ग असतात. एक तर ते अ‍ॅप अंतर्गत जाहिराती दाखवू शकतात किंवा त्यांचे अ‍ॅप विकू शकतात. या दोन मार्गांपैकी कोणतातरी एक मार्ग व्यवहारात चालल्याखेरीज ते आपले काम सुरु ठेवू शकत नाहीत.

स्मार्टफोन अ‍ॅप्स
स्मार्टफोन अ‍ॅप्स

त्यांनी जर अ‍ॅप अंतर्गत जाहिराती दाखवल्या, तर सहाजिकच जाहिरातदारांचीही त्यांच्याकडून काही अपेक्षा असणार! कारण जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातीतून फायदा झाल्याखेरीज ते तरी आपल्या जाहिराती का दाखवत राहतील? जाहिरातदार हे व्यवसायिक असतात आणि आपले उत्पादन विकून नफा मिळवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. प्रत्येक जाहिरातदार हा ग्राहकहीत सर्वोच्च मानणारा प्रामाणिक व्यवसायिक असेलच असे नाही. त्यामुळे अ‍ॅपच्या माध्यमातून काही स्पॅम जाहिरातीदेखील आपल्यासमोर येऊ लागतात. काही अ‍ॅप उत्पादक हे अधिकचे उत्पन्न कमवण्याच्या मोहात किंवा अपरिहार्यतेमुळे अशा स्पॅम जाहिरातींचा आपल्यावर भडीमार करतात. शिवाय जाहिरातींमुळे उत्पादन खर्चात वाढ होते ती वेगळीच!

जाहिरातींमुळे एखादे अ‍ॅप वापरत असताना व्यत्यय येतो व आपली एकाग्रताही काही अंशी खंडीत होते. जाहिरातींचे हे दुष्परिणाम जर नको असतील, तर ते अ‍ॅप विकत घेण्याचा दुसरा पर्याय उपयुक्त ठरतो. अ‍ॅप विकत घेतल्याने आपण ही खात्री बाळगू शकतो की, अ‍ॅप निर्मात्यास त्याचे कष्टाचे फळ मिळत आहे. तेंव्हा तो भविष्यातही हे काम असेच करत राहिल. याउलट मोफत मिळणारे चांगले अ‍ॅप्स हे अनेकदा पुरेश्या पैशांची तजवीज न झाल्याने बंद पडतात. यावरुन आपल्याला असे लक्षात येते की, एखाद्या अ‍ॅपने चांगल्याप्रकारे टिकाव धरण्याकरिता थेट उत्पन्न आवश्यक आहे. त्यामुळे अशाप्रकारचे एखादे अ‍ॅप हे सहसा विकत घ्यावे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.