भाषांतरात मदत करुन स्मार्टफोन जिंका!
मला काहीवेळा वाचकांकडून विचारणा होते की, ‘एखाद्या इंग्लिश पानाचे मराठी भाषेत आपोआप भाषांतर करता येऊ शकते का?’. दूर्देवाने मला या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागतं, कारण ‘गूगल ट्रांसलेट’च्या माध्यमातून जरी हे शक्य असलं, तरी त्यामार्फत होणारे भाषांतर हे इतक्या हलक्या प्रतीचे असते की, भाषांतरीत पानाचा काहीही अर्थ लागत नाही. पण आपण जर गूगल ट्रांसलेटला आपली भाषा व्यवस्थित शिकण्यास मदत केली, तर ही परिस्थिती पालटू शकते. अशाने इंग्लिश भाषेचा ज्ञानार्जनातील अडसर दूर होईल.
समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांपर्यंत जर ज्ञान पोहचवायचं असेल, त्यांचे जीवन प्रकाशमान करायचे असेल, तर मतृभाषेला पर्याय नाही. ही गोष्ट आपल्या समाजातील बहुतांश धुरिणांना समजत नसली, तरी स्वभाषेचे महत्त्व हे परकीय लोक व्यवस्थित समजून आहेत. त्यामुळे आज आपल्याला ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’सारखे कोणतेही संकेतस्थळ मराठी भाषेत दिसणार नाही; पण गूगल, ट्विटर, फेसबुक, यांच्यासाठी मात्र अगदी सहज ‘मराठी’ भाषा निवडता येईल. आपल्या सरकारला मातृभाषेशी कितपत देणेघेणे आहे? हा वेगळा विषय आहे! पण परदेशी गूगलने मात्र त्यासाठी ‘Translatathon 2015’च्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे.

गूगलने आपणा सर्वांना इंग्लिशच्या मराठी भाषांतरासाठी मदतीचं आवाहन केलं आहे! १६ डिसेंबर २०१५ ते ३० डिसेंबर २०१५ या कालावधीत आपण ‘गूगल ट्रांसलेट’ला मराठी शिकण्यास मदत केली, तर सर्वांत अधिक व सर्वांत चांगली मदत करणार्या पहिल्या ५० जणांना गूगलकडून ‘अँड्रॉईड वन’ हा स्मार्टफोन मिळेल. मराठीसाठी, समाजासाठी चांगले कार्य करता असताना, जर त्यास प्रोस्ताहन मिळत असेल, तर ही एक निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. या उपक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला या इथे जाऊन आपले नाव व ईमेल पत्ता द्यावा लागेल – Translatathon 2015.
आजकाल सर्वत्र इंग्लिशचे अवडंबर माजल्याचे दिसून येते. ‘गूगल ट्रांसलेट’ हा यावरील एक उत्तम उतारा आहे. तेंव्हा अधिकाधिक लोकांनी ‘गूगल ट्रांसलेट’च्या कार्यात सहभाग नोंदवून एकप्रकारे समाजकार्यास हातभार लावावा. शिवाय ‘गूगल ट्रांसलेट’ हा एक सतत चालणारा उपक्रम आहे. तेंव्हा केवळ १६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यानच हे कार्य करता येईल असे नाही. आपल्याला जर भाषांतराची आवड असेल, तर अधूनमधून फावल्या वेळात आपण ‘गूगल ट्रांसलेट’ला आपली मराठी भाषा शिकवू शकाल.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016