लिनोवो एन ५० वायरलेस माऊसची समिक्षा

मी माझं सारं काम माझ्या लॅपटॉपवरुन करतो. लॅपटॉपला तशी माऊसची गरज नसते, कारण आपण टचपॅडचा वापर करतो. पण मी लॅपटॉपवर अनेकानेक तास काम करतो. तेंव्हा माऊस वापरणं हे टचपॅडचा वापर करण्याहून खचितच अधिक सोयीचं ठरतं. याच विचारांतून या वर्षीच्या सुरुवातीला मी ‘लिनोवो एन ५० वायरलेस माऊस’ विकत घेतला. हा माऊस मी अनेक महिन्यांपासून वापरतोय, तेंव्हा आता त्याची समिक्षा करायला हरकत नाही.  त्यावेळी सुमारे ७५० रुपयांना घेतलेला हा माऊस आजही जवळपास तेव्हढ्याच किंमतीला उपलब्ध आहे. प्रथम आपण या माऊसची वैशिष्ट्ये पाहू आणि त्यानंतर मी माझं त्यावरील मत व्यक्त करेन.

लिनोवो एन ५० वायरलेस माऊसची वैशिष्ट्ये

लिनोवोचा हा माऊस मी विकत घेतला त्याचं प्रमुख कारण म्हणजे हिर्‍यासारखे पैलू असणारा हा माऊस दिसायला वेगळा आणि आकर्षक आहे. खाली दिलेल्या चित्रात आपण तो पाहू शकता. या माऊसची तांत्रिक वैशिष्ट्ये पुढे एक एक करुन देत आहे.

  • हा एक ‘वायरलेस माऊस’ आहे व तो सर्वसाधारणपणे १० मिटरच्या क्षेत्रात काम करतो.
  • या माऊसला ‘स्क्रोल’ आहे.
  • १००० dpi रिझोल्युशन
  • ऑपटिकल तंत्रज्ञान
  • १९१ ग्रॅम वजन
  • १ वर्षाची वॉरंटी

हा माऊस एका AA बॅटरीवर चालतो. AA बॅटरी म्हणजे आपला नेहमीच्या आकाराचा सेल जो कोणत्याही दुकानात मिळतो. पण या माऊससोबत मला मिळालेला सेल आजतागायत कार्यरत असून मला यात दुसरा सेल अजूनतरी टाकावा लागलेला नाही. हा माऊस वापरणार्‍यांनी त्यास ऑनलाईन साईट्सवर नावाजलेलं आहे आणि मला वाटतं त्यात तथ्य आहे. कारण ‘लोनोवो एन ५० या माऊस’ची कार्यक्षमता पाहता मी या माऊसला ५ पैकी ५ गुण देईन.

लिनोवो एन ५० वायरलेस माऊस
लिनोवो एन ५० वायरलेस माऊस असा दिसतो

लिनोवो एन ५० वायरलेस माऊस दिसायला तर उत्कृष्ट आहेच! पण तो त्याचे कार्यही अगदी चोख बजावतो. नॅनो रिसिव्हरच्या सहाय्याने हा माऊस संगणकाशी अगदी सहजतेने जोडला जातो. तो आपल्या हातात अगदी व्यवस्थित बसतो. हा एक वायरलेस माऊस असला, तरी आपल्याला त्यातून एखादी लाल लाईट बाहेर पडताना दिसणार नाही. तेंव्हा रात्रीच्या अंधारात लॅपटॉपचा वापर करत असताना आपल्याला माऊसच्या प्रकाशाचा व्यत्यय येण्याचे कारण नाही. शिवाय काम झाल्यानंतर आपण हा माऊस बंद करुन ठेवू शकतो. त्यासाठी तो बंद – चालू करण्याचे बटन देण्यात आलेले आहे.

घ्यावे की न घ्यावे?

लिनोवो एन ५० वायरलेस माऊस जवळपास एक वर्ष वापरला असता, मला अगदी कोणतीही समस्या भेडसावलेली नाही. तेंव्हा मी निश्चितपणे हा माऊस घेण्यासंदर्भात सुचवेन!

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.