वाय-फाय वापरुन फाईल्सची देवाणघेवाण

पूर्वी एका मोबाईल फोनवरुन दुसर्‍या मोबाईल फोनवर एखादी फाईल पाठविण्याकरिता इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला जायचा. त्यानंतर याच कामाकरिता अधिक सुधारित असे ब्ल्यूटुथ तंत्रज्ञान सर्वत्र वापरले जाऊ लागले. आता मात्र ब्ल्यूटुथ तंत्रज्ञानही मागे पडले असून वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून फाईल्सची देवाणघेवाण केली जाते.

वाय-फाय म्हटले की, कदाचित आपल्या डोळ्यांसमोर इंटरनेट येत असावे. त्यामुळे या इथे ‘इंटरनेटयुक्त वाय-फाय’ आणि ‘इंटरनेट विरहित वाय-फाय’ असा फरक करायला हवा. आत्ता आपण ‘इंटरनेट विरहित वाय-फाय’बाबत बोलत आहोत. म्हणजे समजा, आपण मोबाईलवरील ३जी इंटरनेट बंद केले, किंवा मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकले. त्यानंतर आपल्या स्मार्टफोनरील Mobile Wi-Fi hotspot ही सुविधा सुरु केली. अशाने जे वाय-फाय क्षेत्र तयार होईल, त्यास ‘इंटरनेट विरहित वाय-फाय’ म्हणता येईल.

कारण आता आपल्या स्मार्टफोनने एक वाय-फाय क्षेत्र जरी निर्माण केले असले, तरी त्यावरील इंटरनेट बंद असल्याने त्या वाय-फाय क्षेत्रातून स्मार्टफोनवरील इंटरनेट डेटा प्रवाहित होत नाही.

वाय-फाय वापरुन फाईल पाठवणे
‘सुपरबिम’ अनुप्रयोगाच्या सहाय्याने एका स्मार्टफोनच्या वाय-फाय क्षेत्राशी जर दुसरा स्मार्टफोन जोडायचा असेल, तर अशाप्रकारे बारकोड स्नॅन करावा लागतो किंवा दिलेला संकेत वापरावा लागतो.

आपल्या स्मार्टफोनवरील वाय-फाय हॉटस्पॉट सुरु केल्यानंतर स्मार्टफोनभोवती वाय-फायचे एक मर्यादित क्षेत्र निर्माण होते. बारकोड किंवा संकेत वापरुन आपण दुसरे एखादे उपकरण या वाय-फाय क्षेत्राशी जोडू शकतो. अशाप्रकारे दोन उपकरणे जेंव्हा एका वाय-फाय नेटवर्क अंतर्गत येतात, तेंव्हा त्यांच्या दरम्यान ध्वनिफीत, चित्रफीत, छायाचित्र, किंवा इतर कोणत्याही स्वरुपातील फाईल्सचे आदानप्रदान होऊ शकते. अशाप्रकारे होणारी देवाणघेवाण ही गतीमान असते, शिवाय ती अधिक चांगल्याप्रकारे घडते. पण वाय-फायच्या सहाय्याने एखादी फाईल पाठवण्यापूर्वी आपल्या स्मार्टफोनवरील ३जी इंटरनेट बंद करावे! अन्यथा नाहक ३जी डेटा वापरल्याचे बिल आपणास पडू शकते. Superbeam (सुपरबिम) हा याकामी वापरला जाणारा एक लोकप्रिय अनुप्रयोग आहे. तरी अशाप्रकारचे अनेक मोफत अनुप्रयोग हे गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.