जीमेल पत्त्याची क्लुप्ती

आपल्या स्मार्टफोनवर ईमेल वाचण्यापासून आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. पूर्वीच्या पत्रव्यवहाराची जागा ही आता ईमेलने घेतली आहे. ईमेल संदेशवहनाचे आधुनिक साधन आहे. आजच्या काळातील व्यवहार ईमेलखेरीज पूर्ण होणे कठीण आहे! असा हा ईमेल आपल्या दैनंदिन जीवनाचा एक घटक बनला आहे. तरी देखील आपल्यापैकी बर्‍याचजणांना त्याची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये माहित नसतात. म्हणूनच आज आपण ईमेलमध्ये लोकप्रिय अशा ‘जीमेल’ची काही खास वैशिष्ट्ये पाहणार आहोत!

जीमेल पत्त्यात ‘टिंब’ देणे

समजा आपला जीमेल पत्ता abc@gmail.com असा आहे. तर या पत्त्यातील abcमध्ये कुठेही एखादा टिंब दिला आणि त्या पत्त्यावर ईमेल पाठवला, तरीही तो ईमेल आपल्यालाच मिळतो.

उदाहरणार्थ

जर एखाद्याने abc@gmail.com, a.bc@gmail.com किंवा ab.c@gmail.com या पत्त्यावर ईमेल पाठवला, तर तो आपल्यालाच मिळेल.

याचा उपयोग काय?

आपल्याला येणार्‍या ईमेलची गाळणी (Filter) करुन विभागवारी करण्याकरीता या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो.
एखाद्या संकेतस्थळावर खाते उघडत असताना आपला ईमेल पत्ता मागितला जातो. आता पुन्हा त्याच संकेतस्थळावर दुसरे खाते उघडायचे झाल्यास आपणास तोच ईमेल पत्ता देऊन चालत नाही, तर आपणास दुसरा एखादा ईमेल द्यावा लागतो. परंतु दोन्ही खात्यांसाठी आपणास एकच ईमेल पत्ता वापरायचा असेल, तर मात्र वर सांगितल्याप्रमाणे पहिल्याच ईमेल पत्त्यात टिंबाचा वापर करावा आणि तो दुसर्‍या ईमेलप्रमाणे वापरावा.

जीमेल मोबाईल
जीमेल

जीमेल पत्त्यात अधिक चिन्हाचा वापर

समजा आपला जीमेल पत्ता abc@gmail.com असा आहे. तर या पत्त्यातील abc पुढे ‘अधिकचे चिन्ह’ (+) देऊन काही लिहिले; तर एकंदरीत जो नवा पत्ता तयार होईल, त्यावर पाठवलेला ईमेलही आपल्यालाच मिळतो.

उदाहरणार्थ

जर एखाद्याने abc@gmail.com, abc+engineer@gmail.com, abc+writer@gmail.com किंवा abc+marathi@gmail.com या पत्त्यावर ईमेल पाठवला, तर तो आपल्यालाच मिळेल.

याचा उपयोग काय?

एकाच ईमेल पत्त्याचा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग करण्याकरिता या क्लुप्तीचा वापर होऊ शकतो. अशाप्रकारे ईमेलची कामानुरुप वर्गवारी करणे सहजशक्य होते.

अनेकदा न्यूजलेटर किंवा ईपुस्तक मिळविण्यासाठी एखाद्या संकेतस्थळावर आपला ईमेल पत्ता मागितला जातो. आपणास जर त्या संकेतस्थळाच्या विश्वासार्हतेबद्दल साशंकता असेल, तर वर नमूद केल्याप्रमाणे एखादा ईमेल पत्ता तयार करुन आपण तो आवश्यक त्या ठिकाणी देऊ शकतो. समजा भविष्यात जर या पत्यावर स्पॅम ईमेल येऊ लागले, तर अशाने आपणास तो पत्ता सहजतेने ब्लॉक करता येतो.

आपण ज्या गोष्टींचा दररोज वापर करतो, त्या गोष्टींबाबत व्यवस्थित माहिती असेल, तर आपली कार्यक्षमता वाढीस लागते. आज जीमेलची ही नवी वैशिष्ट्ये समजल्याने भविष्यात आपली कार्यक्षमता अशीच वाढीस लागेल अशी आशा आहे!

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.