सनहायजर सीएक्स १८० इअरबड्सची समिक्षा

ऑनलाईन शॉपिंग करत असताना आपण एखाद्या उत्पादनासंदर्भात ग्राहकांच्या समिक्षा वाचतो, प्रश्नोत्तरे वाचतो आणि त्यानंतर ते उत्पादन घ्यायचे की नाही? ते ठरवतो. अधिक विश्वासार्ह समिक्षा जर वाचायची असेल, तर समिक्षेसोबत Certified Buyer असे लिहिले आहे का? ते तपासून पहातो. Certified Buyer म्हणजे ज्याने खरंच ते उत्पादन प्रत्यक्ष विकत घेतले आहे अशी व्यक्ति.  ‘सनहायजर (Sennheiser) सीएक्स १८०’ इअरबड्स विकत घेण्यापूर्वी मी देखील अशाच समिक्षा व प्रश्नोत्तरे वाचली आणि त्यानंतर हे ‘इअरबड्स’ (Earbuds) म्हणजेच कानाच्या आत घालायचे हेडफोन्स विकत घ्यायचे ठरवले.  मागील काही दिवसांपासून मी हे इअरबड्स वापरत आहे आणि त्यामुळे आज मी स्वतः त्याची समिक्षा करत आहे.

‘सनहायजर सीएक्स १८०’ची किंमत व गुणांकन

‘अमेझॉन’ या संकेतस्थळावर या इअरबड्सची ५ हजारांहून अधिक लोकांनी मिळून समिक्षा केलेली आहे आणि त्यास जवळपास पाच पैकी पाच गुण दिलेले आहेत. शिवाय हे इअरबड्स घेऊ पाहणार्‍यांच्या ५०० हून अधिक प्रश्नांची त्यावर उत्तरे दिलेली दिसतात. या उत्पादनावर स्विकृतदर्शनी कौतुकाचा वर्षाव केला गेलेला आहे. तेंव्हा सहाजिकच माझी अशी भावना झाली की, हे एक चांगले उत्पादन असावे. मी साधरण ८०० ते ९०० रुपयांदरम्यान हे इअरबड्स विकत घेतले. या नवीन इअरबड्सबाबत मी मनोमन उत्सुक होतो, पण ते प्रत्यक्ष वापरण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र माझी घोर निराशा झाली. या इअरबड्समधून आवाज येतो, या एकमेव कारणासाठी मी त्यास ५ पैकी १ गूण देईन.

सनहायजर सीएक्स १८० इअरबड्स
सनहायजर सीएक्स १८० इअरबड्स

सनहायजर सीएक्स १८० इअरबड्सच्या मर्यादा

सनहायजर सीएक्स १८० इअरबड्स कानात घातल्यानंतर आपण जरा जरी हालचाल केली आणि त्याच्या वायरचा आपल्याला हलकासा जरी स्पर्श झाला, तर ‘खडखडाट’ ऐकू येतो. ही या इअरबड्सची ‘प्रचंड मोठी’ समस्या आहे. यासोबत तीन वेगवेगळे इअरपिसेस मिळतात. मी ते तिन्ही इअरपिसेस वापरुन पाहिले, तरीही त्यातून ऐकू येणारा ‘खडखडाट’ लोप पावला नाही. शिवाय यातून ऐकू येणार्‍या आवाजात तीक्ष्णता असून त्यामुळे कानाला त्रास होऊ शकतो. मी यापूर्वी फिलिप्स आणि सोनीचे हेडफोन्स वापरलेले आहेत. त्यांच्याशी तुलना करता मी हे निश्चितपणे सांगू शकतो की, या इअरबड्सच्या आवाजाला तो दर्जा नाही.

घ्यावे की न घ्यावे?

एकंदरीत सांगायचे झाल्यास मी आपल्याला  ‘सनहायजर सीएक्स १८०’ इअरबड्सपासून दूर राहण्याचा सल्ला देईन. शिवाय यापुढे Certified Buyersच्या प्रतिक्रियांवर देखील जपून विश्वास ठेवावा लागेल असे दिसते.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.