एअरटेल ४जी

काळ पुढे जाईल तसं इंटरनेटची गती वाढत आहे आणि दर कमी होत आहेत. त्यामुळे सहाजिकच ते आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू लागले आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वरचेवर इंटरनेट जोडणी (Internet Connection) घेणेदेखील सोपे होत आहे. ‘एअरटेल ४जी’ने यासंदर्भात चांगला पुढाकार घेतला आहे. एअरटेलने ४जी इंटरनेट वापरण्यासाठी आपल्यासमोर ३ मुख्य पर्याय ठेवलेले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय हा ४जी स्मार्टफोनचा आहे. आपल्याकडे जर ४जी इंटरनेट चालू शकेल असा नवीन स्मार्टफोन असेल, तर आपण त्यावर ४जी सिमकार्ड वापरुन ४जी इंटरनेट वापरु शकाल. त्यानंतर अर्थातच आपल्या स्मार्टफोनवरील वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करुन, म्हणजेच स्मार्टफोनचा वाय-फाय राऊटरप्रमाणे वापर करुन आपणास स्मार्टफोनवरील ४जी इंटरनेट हे घरातील संगणक, टॅब अशा इतर उपकरणांवर वापरता येईल.

एअरटेल ४ जी हॉटस्पॉट

एअरटेल ४जी हॉटस्पॉट हे घरातील वाय-फाय राऊटरप्रमाणे काम करते. पण यास जोडण्याकरिता एअरटेलचे कोणतेही वायर्ड ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागत नाही. आपल्या स्मार्टफोनवर जसे वायरलेस इंटरनेट चालते, अगदी त्याचप्रमाणे एअरटेल ४जी हॉटस्पॉट वायरलेस काम करते. आपल्या घरातील १० उपकरणे आपण एअरटेलच्या या हॉटस्पॉटला जोडू शकतो. एअरटेल ४जी हॉटस्पॉट या उपकरणाची किंमत ही २३०० रुपये इतकी आहे. हे उपकरण घेतल्यानंतर इंटरनेटकरिता आपल्या सोयीची प्रीपेड योजना निवडता येते. सध्या ३.५ जीबी ४जी इंटरनेट ६९८ रुपयांना उपलब्ध आहे. वेब ब्राऊजिंगसाठी एव्हढे इंटरनेट पुरेसे आहे, पण चित्रप्रवाह (Online Video) आणि प्रवाहवाणी (Internet Radio) याकरिता ३.५ जीबी पुरणार नाहीत. त्यामुळे अधिकच्या वापरासाठी एअरटेलने दिलेला तीसरा पर्याय त्यातल्यात्यात योग्य ठरतो!

एअरटेल ४जी हॉटस्पॉट
एअरटेल ४जी हॉटस्पॉट हे उपकरण असे दिसते.

 एअरटेल ४जी होम वाय-फाय

‘एअरटेल ४जी होम वाय-फाय’ हा एक पोस्टपेड पर्याय आहे. यातही आपणास वाय-फाय राऊटरप्रमाणे एक उपकरण विकत घ्यावे लागेल. या उपकरणाची किंमत २५०० रुपये इतकी असून, त्यास स्मार्टफोन, टॅब, स्मार्टटिव्ही यांसारखी ३२ उपकरणे जोडता येऊ शकतात. या पर्यायात एअरटेल ४जीचे दर काहीसे कमी ठेवण्यात आलेले आहेत. ९९५ रुपयांत १० जीबी, १२९५ रुपयांत १५ जीबी, १९९५ रुपयांत ३० जीबी, इत्यादी.

सध्या ४जी इंटरनेट नुकतेच सुरु झाले असून त्याचे दर हे निश्चितपणे जास्त आहेत. त्या तुलनेत ब्रॉडबँड इंटरनेट हे फारच स्वस्त आहे. पण ४जीचा फायदा असा आहे की, आपण आपले ४जी उपकरण आपल्यासोबत कुठेही नेऊ शकतो. ब्रॉडबँड इंटरनेटबाबत मात्र हे शक्य होत नाही. शिवाय उतरवण्याच्या गतीसोबतच (Download Speed) ४जी इंटरनेटची चढवण्याची गतीही (Upload Speed) अधिक असते. ४जी पूर्णतः वायरलेस असल्याने त्याची जोडणी घेणे हे ब्रॉडबँड जोडणीपेक्षा अधिक सहज आणि सोपे आहे. एअरटेल ४जी संदर्भात अधिक माहिती आपल्याला या इथे मिळेल (इंग्लिश) – एअरटेल ४जी.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.