क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय?

क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय? हे जाणून घेण्यापूर्वी जर आपण डेटा सेंटर संदर्भात अधिक माहिती घेतली, तर आपणास क्लाऊड स्टोरेजबाबत चटकन कल्पना येईल. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमधील माहिती ही मेमरीकार्डवर साठवली जाते, त्याचप्रमाणे इंटरनेटवरील माहिती ही प्रामुख्याने डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. ‘क्लाऊड स्टोरेज’ एका अशा व्यवस्थेचे नाव आहे, ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपल्याजवळील फाईल्स या अशा डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवतो. एखाद्या उदाहरणाने ही गोष्ट अधिक चांगल्यारितीने स्पष्ट होईल.

समजा आपण सुट्टिच्या दिवशी बाहेर कुठेतरी फिरायला गेला आहात. आपल्या आयुष्यातील त्या सुरेख दिवसाच्या आठवणी आपण स्मार्टफोनवरील कॅमेरॅच्या सहाय्याने कैद केल्या आहेत. पण घरी परतत असताना आपला स्मार्टफोन हरवला. तर अशावेळी स्मार्टफोनसोबतच त्या दिवसाच्या आठवणीदेखील हरवून जातील. पण आपण जर ‘क्लाऊड स्टोरेज’ सेवेचा वापर करत असाल, तर मात्र आपल्याला आणखी एक संधी मिळू शकेल. कारण त्यातील ‘कॅमेरा बॅकअप’ हा पर्याय जर त्यावेळी सुरु असेल, तर स्मार्टफोनवरुन काढलेले छायाचित्र हे इंटरनेटच्या माध्यमातून तत्काळ अपलोड होऊन क्लाऊड स्टोरेज सेवेच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित जमा झालेले असेल. अशाप्रकारे स्मार्टफोन हरवला तरी देखील छायाचित्रे हरवणार नाहीत.

आपल्या जवळील सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या फाईल्स डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्याकरीता लागणारे जे माध्यम आहे त्यास ‘क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस’ असे म्हणतात; आणि या एकंदरीत व्यवस्थेस सर्वसाधारणपणे ‘क्लाऊड स्टोरेज’ असे म्हटले जाते. गूगलची ‘गूगल ड्राईव्ह’ ही सेवा ‘क्लाऊड स्टोरेज’चे एक उत्तम उदाहरण आहे. गूगल ड्राईव्हवर आपण आपल्याजवळील डेटा फाईल्स अपलोड करुन सुरक्षित ठेवू शकतो आणि आवश्यक त्यावेळी त्या फाईल्सचा वापर करु शकतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवरील, संगणकावरील महत्त्वाच्या फाईल्स जरी हरवल्या, गहाळ झाल्या तरी चिंता करण्याचे काही कारण उरत नाही.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.