फ्लिपबोर्ड काय आहे?
‘फ्लिपबोर्ड’ हा स्मार्टफोनवरील एक अनुप्रयोग आहे (Smartphone app) जो एखाद्या नियतकालिकाप्रमाणे (Magazine) भासतो. कारण ही सेवा नियतकालिकाच्या स्वरुपात दिसेल, अशा तर्हेने तयार केलेली आहे. ‘फ्लिपबोर्ड’ हा अनुप्रयोग स्मार्टफोनवर अधिक चांगल्याप्रकारे काम करत असला, तरी तो स्मार्टफोनपुरता सिमित नसून आपण संगणकावरील वेब ब्राऊजरच्या सहाय्यानेही फ्लिपबोर्डची ही सेवा वापरु शकतो. फ्लिपबोर्ड जगभरात लोकप्रिय असून विविध विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी या सेवेचा चांगला लाभ होऊ शकतो. फ्लिपबोर्ड अंतर्गत आपण इतरांनी निर्माण केलेल्या नियतकालिकांचे अनुसरण करु शकतो, शिवाय स्वतःचेही नियतकालिक तयार करु शकतो.
टॅगनुसार तयार झालेले नियतकालिक
फ्लिपबोर्डवर इंटरवनेटवरील विविध संकेतस्थळांवरील बातम्या व लेख सापडतात. इथे टॅगच्या सहाय्याने इंटरनेटवरील बातम्यांचे व लेखांचे विषयानुरुप वर्गिकरण करण्यात आलेले आहे. आपण यातील कोणत्याही टॅगचे अनुसरण (Follow) करु शकतो. उदाहरणार्थ समजा मला Internet या विषयात रस आहे, तर मी Internet या टॅगचे अनुसरण करु शकतो. टॅगचे अनुसरण करणे हे जणू एखाद्या नियतकालिकाचे मोफत सदस्यत्त्व स्विकारण्यासारखे आहे. कारण एखाद्या टॅगचे अनुसरण करताच फ्लिपबोर्डमध्ये त्या टॅगच्या नावाने एक नियतकालिक तयार झाल्याचे आपल्या दिसते. त्यानंतर भविष्यात त्या टॅगखाली जे काही नवे लेख येतील, ते त्या टॅगच्या नावे तयार झालेल्या नियतकालिकात दिसतील.
इतरांनी तयार केलेले नियतकालिक
फ्लिपबोर्डवर प्रत्येकजण आपले स्वतःचे एक नियतकालिक सुरु करु शकतो. हे म्हणजे फेसबुकवर एक नवे पेज तयार करण्यासारखे आहे. इतरांच्या फेसबुक पानाचे आपण जसे अनुसरण करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण फ्लिपबोर्डवर इतरांनी तयार केलेल्या नियतकालिकांचे अनुसरण करु शकतो. फेसबुक पानाप्रमाणेच ही नियतकालिकेदेखील सहसा एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेली असतात.
स्वतःचे नियतकालिक सुरु करणे
फ्लिपबोर्डवर आपणास आपले स्वतःचे नियतकालिक जर सुरु करायचे असेल, तर त्यासाठी स्वतः काहीही लिहावे लागत नाही. फ्लिपबोर्डवरील नियतकालिक हे एखाद्या फोल्डरप्रमाणे आहे, ज्यात आपण आपल्या आवडीचे लेख जमा करतो. फेसबुक पानावरुन आपणास जसे आपल्या आवडत्या लेखाचे धागे वाटता येतात, अगदी त्याचप्रमाणे फ्लिपबोर्डवर आवडलेला कोणताही लेख हा आपल्या नियतकालिकाअंतर्गत जोडता येतो.
फ्लिपबोर्डची संकल्पना – थोडक्यात
फ्लिपबोर्डच्या सहाय्याने इंटरनेटवरील बातम्या व लेख नियतकालिकाच्या स्वरुपात वाचता येतात. यात आपण आपल्या आवडत्या विषयांचे, नियतकालिकांचे अनुसरण करु शकतो. शिवाय त्यातील आवडीचे लेख हे स्वतःच्या नियतकालिकात जमा करुन ठेवून शकतो. ताज्या बातम्यांसाठी फ्लिपबोर्डचा विशेषत्त्वाने वापर केला जातो. ज्यांना नवनवीन माहिती मिळवायला आवडते, त्यांच्यासाठी फ्लिपबोर्ड हा एक उत्कृष्ट अनुप्रयोग (App) आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016