HTML शिकण्याकरिता उत्तम अनुप्रयोग
आत्ता आपण ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’चे इंटरनेटवरील एक ‘वेब पेज’ पहात आहात. हे पान आत्ता आपल्याला वेब ब्राऊजरच्या सहाय्याने दिसत आहे. या लेखाचे शिर्षक हे ठळक आकारात दिसत आहे. शिवाय या लेखात परिच्छेद आहेत, धागा आहे, चित्र आहे. पण वेब ब्राऊजरला मूळात कसं कळतं की, कुठे परिच्छेद असायला हवा? आणि कुठे चित्र दिसायला हवे? त्यासाठी आपण वेब ब्राऊजरशी त्याला समजेल अशा भाषेत संवाद साधायला हवा! आणि म्हणूनच HTML अर्थात Hiper Text Markup Language ही भाषा शिकायला हवी. एकदा ही भाषा शिकल्यानंतर इंटरनेटवरील आपले पान कसे दिसायला हवे? ते आपणास वेब ब्राऊजरला सांगता येईल.
HTML शिकणं हे मूळीच अवघड नाही. आपल्याला जर शिकण्याची मनापासून ईच्छा असेल, तर आपण HTML अगदी सहजतेने शिकू शकाल. त्यासाठी Learn HTML हा sololearnचा मोफत अनुप्रयोग (App) अतिशय उत्तम आहे! या अनुप्रयोगाचा वापर केल्यास आपल्याला HTML अगदी सहजतेने अवगत होईल अशी मला खात्री आहे. हा अनुप्रयोग आत्तापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर उतरवला असून (Download केला) त्यास १० हजारांहून अधिक लोकांनी मिळून ५ पैकी ४.४ गुण दिलेले आहेत.
या अनुप्रयोगात HTML Basics आणि HTML 5 असे दोन प्रमुख विभाग आहेत. प्रत्येक विभागात काही ठराविक धडे आहेत. धड्यांमध्ये प्रथम लिखित स्वरुपात अत्यंत थोडक्यात व सोप्या शब्दांत आपल्याला HTMLच्या संकल्पना समजावल्या जातात; आणि त्यानंतर आपल्याला त्यातील ज्ञान कितपत अवगत झाले आहे? ते तपासण्यासाठी आपली छोटीशी चाचणी घेतली जाते. धड्यांमधील लिखित स्वरुपातील मजकूर हा चित्रफितीच्या सहाय्याने देखील समजून घेता येतो. पण चित्रफीत पाहणे परवडण्यासाठी अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट असणे आवश्यक आहे. शिकवण्यात येत असलेल्या संकल्पनेसंदर्भात चर्चा करण्याची सोयही या अनुप्रयोगात करुन देण्यात आलेली आहे.
या अनुप्रयोगामार्फत पुरवण्यात येणारा मोफत HTML कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला पोचपावती म्हणून अनुप्रयोगातच एक सर्टिफिकेट दिले जाईल. Learn HTML हा अनुप्रयोग विद्यार्थ्यांसाठी तर विशेष उपयुक्त आहेच! पण ज्यांना कोणाला वेब ब्राऊजरची भाषा शिकायची आहे, त्यांच्यासाठी तो मोलाचा आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016