क्लाऊड स्टोरेज – ड्रॉपबॉक्स

‘ड्रॉपबॉक्स’ (Dropbox) हे क्लाऊड स्टोरेजच्या क्षेत्रातील एक सुपरिचित आणि नावाजलेले नाव आहे. ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून आपण आपल्या जवळील छायाचित्रे, चित्रफिती आणि इतर फाईल्स या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवू शकतो. ड्रॉपबॉक्सचे स्मार्टफोनसाठी अ‍ॅप आहेत, संगणकासाठी सॉफ्टवेअर आहे आणि शिवाय त्यांचे एक संकेतस्थळही आहे.

ड्रॉपबॉक्सची प्रमुख वैशिष्ट्ये

जर मी माझ्या स्मार्टफोनवरील एखादे छायाचित्र त्यावरील ड्रॉपबॉक्स अ‍ॅप्सच्या सहाय्याने अपलोड केले, तर काही क्षणातच मला ते संगणकावरील ड्रॉपबॉक्स फॉल्डरमध्येही दिसू लागते. शिवाय जर मी त्यांचे संकेतस्थळ उघडले, तर मला तिथे देखील ते छायाचित्र दिसेल. या वैशिष्ट्यास Sync (सिंक) असे म्हणतात. यालाच मराठीत ‘मेळ’ असे म्हणण्यास हरकत नाही.

‘कॅमेरा बॅकअप’ हे ड्रॉपबॉक्सचे आणखी एक वैशिष्ट आहे. ड्रॉपबॉक्समधील हे वैशिष्ट्य सुरु केल्यास स्मार्टफोनच्या सहाय्याने घेतलेले छायाचित्र आपल्याला स्वतःहून अपलोड करावे लागत नाही; तर हे छायाचित्र आपोआपच ड्रॉपबॉक्सच्या सहाय्याने अपलोड होऊन त्यांच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षितपणे जतन केले जाते.

ड्रॉपबॉक्सवर आपणास २ जीबी इतकी जागा मोफत देण्यात येते. पण आपण जर आपल्या एखाद्या मित्रास ड्रॉपबॉक्स वापरण्याकरीता आमंत्रित केले आणि त्या मित्राने जर ते आमंत्रण स्विकारले, तर आपल्याला त्याबदल्यात ५०० एमबी अतिरिक्त जागा मिळते. अशाप्रकारे आपल्याला १६ जीबी अतिरिक्त जागा मिळू शकते.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.